शिक्षण विभागाच्या गचाळ कारभारामुळे शिक्षकांना फटका; पैशांसाठी भटकंती

0

जळगाव (प्रदिप चव्हाण) – जि ल्हा परिषद शिक्षण विभाग सुस्त असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सर्व शासकीय कर्मचार्‍यांचे मासिक वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेमार्फेत होत असते. मात्र जल्हा परिषद शिक्षकांचे मासिक वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेत न होता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे होते. शिक्षण विभागाच्या गचाळ कारभाराचा फटका जिल्हा परिषद शिक्षकांना बसला आहे. शासनातर्फे सर्व शासकीय विभागांना पत्र पाठवून कर्मचार्‍यांचे वेतन खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून त्याद्वारे वेतन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शिक्षण विभाग नेहमी प्रमाणेच सुस्त आहे. त्यांनी अद्यापही शिक्षकांचे वेतन खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून घेतलेले नसल्याने जिल्ह्यातील सहा हजार शिक्षकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर शिक्षण विभागाने शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेद्वारे केले असते तर या अडचणींला कदाचीत शिक्षकांना तोेंड द्यावे लागले नसते. रिझर्व्ह बँक नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कमी प्रमाणात रोकड उपलब्ध करुन देत आहे. तसेच जिल्हा बँकेला जुन्या नोटा स्विकारण्याचे आदेश दिलेले नाही.

एटीएम सुविधा नसल्याने सर्वाधिक हाल
जिल्हा बँकेच्या वतीने प्रतिदिन खातेदारांना फक्त दोनच हजार देत आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सुविधा नसल्याने खातेदारांन प्रत्यक्ष बँकेत रांगेत उभे राहूनच पैसे काढावे लागत आहे. प्रत्यक्ष खातेदाराला पैसे काढतांना हजर रहावे लागत असल्याने व बँकेची आणि शाळेची वेळ ही सारखीच असल्याने शिक्षकांना शाळा सुरु असतांनाही पैसे काढण्यासाठी बँके मध्ये रांगेत उभे रहावे लागत आहे. एटीएम सुविधा असल्यास कोठूनही व्यवहार करता येत असते. राष्ट्रीयकृत आणि इतर तत्सम बँके प्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे एटीएम सुविधा नसल्याने खातेदाराला बँकेत प्रत्यक्ष रांगेत उभे राहूनच व्यवहार करावे लागतात.

सर्वाधिक तक्रारी ह्या शिक्षण विभागाबाबत
शासनातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. या सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात सर्वाधिक 23 हरकती ह्या जिल्हा परिषद संदर्भात प्राप्त झाले असून त्यात शिक्षण विभागाबद्दलची तक्रार सर्वाधिक आहे. तसेच जिल्हा परिषदेत नेहमी प्रमाणे सर्वाधिक ओरड ही शिक्षण विभागाबद्दलच असते. जिल्हा परीषद प्रशासनाने त्वरीत याकडे लक्ष देवून संबंधित शिक्षकांच्या प्रश्‍न सोडविण्याची मागणी होत आहे.

शाळा सुरु अन् शिक्षक बँकेत
बँकेत प्रत्यक्ष खातेदार हजर राहिल्या शिवाय पैसे काढता येत नाही. प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा हा नोकरदारांचा वेतन होण्याचा कालावधी असतो. सर्व विभागातील कर्मचार्‍यांचे पगार झाले असून शिक्षकांचे देखील पगार झाले आहे. मात्र जिल्हा बँकेद्वारे प्रतिदिन दोन हजार रुपये उपलब्ध करुन दिले जात असल्याने आणि ही रक्कम तोकडी असल्याने अपुरी पडते. त्यामुळे शिक्षकांना शाळा सुरु असतांनाही पैसे काढण्यासाठी शाळा सोडून बँकेत जावे लागते.