शिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार- दिलीप वळसे पाटील

0
दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे 24 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाची सांगता 
आळंदी : महामंडळ संस्था चालकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करीत आहे. त्यांचे कार्य उत्तम सुरु आहे. या पुढील काळात आता पारंपरिक शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण देऊन शिक्षणाचा विस्तार वाढवण्याचे काम हे सर्व शिक्षण प्रणाली करत असताना त्यामध्ये सरकारची भूमिका व कर्तव्य याची सरकारला जाणीव व्हावी. शिक्षण संस्था व सहकारी संस्था यांच्या विषयी पूर्वग्रह दूषित शासनाने
राहू नये. कोणतेही निर्णय पूर्वग्रह दूषित होऊन घेऊ नये. सध्याची नवीन धोरणेही जास्त घातक आहेत. संस्था, संस्थाचालक शिक्षक, विद्यार्थी यांना संकटातून बाहेर काढण्यास शैक्षणिक संस्थांच्या अडी-अडचणी प्रश्‍न, समस्या सरकार दरबारी मांडण्यास आपण काम करणार असल्याचे माजी उच्च तंत्र शिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. अध्यात्म पंढरी ज्ञानेश्‍वर महाराजांच्या नगरीतील श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेच्या ज्ञानेश्‍वर विद्यालय व कॉलेजच्या प्रांगणात दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे 24 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाची सांगता विविध कार्यक्रमांनी उत्साहात झाली. पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी खासदार अशोक मोहोळ, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार विजय गव्हाणे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, कार्याध्यक्ष आळंदी राज्यस्तरीय अधिवेशन सुरेश वडगांवकर, स्वागताध्यक्ष गणपतराव बालवडकर, पिंपरी-चिंचवड शिक्षण संस्था मंडळ अध्यक्ष तुकाराम गुजर, कार्यकारिणी सदस्य महामंडळ अजित वडगांवकर, ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे खजिनदार डॉ.दीपक पाटील, विश्‍वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुर्‍हाडे, माजी सरपंच नंदकुमार मुंगसे, राज्य महामंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते.
तांत्रिक शिक्षण 5ी पासून 
माजी खासदार मोहोळ म्हणाले की, मेक इन इंडियाचे वारे देशात वाहत आहे. यासाठी तांत्रिक शिक्षण 5 वी पासून देण्याची आवश्यकता आहे. यामुळे देशात मेक इन इंडियाचे स्वप्न साकार करता येईल. डॉ.सागर देशपांडे म्हणाले की, शिक्षण संस्था या विद्यार्थी, एक आदर्श व्यक्ती घडविण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य करीत आहेत. त्यामुळे अशा शिक्षण संस्थांनी सरकारची भूमिका बाजूला ठेवून आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच शिक्षणातून सामाजिक व्यवहाराची जबाबदारी शिकविणे अत्यंत गरजेचे आहे. वाचकाचे गाव तयार करण्याचा संदेश आपण विद्यार्थ्यांना दिला पाहिजे. ह.भ.प.शांतिब्रह्म मारुती महाराज कुर्‍हेकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ.सागर देशपांडे यांचे बदलती शिक्षण पद्धती व संस्था चालकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी निवेदन उज्वला कडलासकर यांनी केले. वसंतराव घुईखेडकर, विजय पाटील, गणपतराव बालवाडकर यांनी शिक्षण संस्थांना भेडसावणार्‍या अडचणी सांगितल्या.
मिनरल वॉटर प्लांटचे लोकार्पण
अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्‍वस्त अ‍ॅड.विकास ढगे पाटील यांच्या अध्यक्षते खाली ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांनी ‘शिक्षण संस्थांत सौर ऊर्जेचा वापर’ या विषयावर व्याख्यान दिले. यामध्ये सर्व प्रथम सोलर ही संकल्पना, सोलरचे प्रकार, सोलर वापरण्याची पद्धत, त्याचे फायदे व सोलर सिस्टिम प्लांटसाठी शासनाचे अनुदान तसेच यातून सर्वातून होणारा फायदा म्हणजे पृथ्वी वरील नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन व प्रदूषणमुक्त जीवन होय असे सांगितले. समारोप प्रसंगी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानतर्फे विकसित मिनरल वाटर प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. अधिवेशन यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.दीपक पाटील, विश्‍वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, पदाधिकारी, सभासद, शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी वृंद, शिक्षक-पालक संघ प्राथमिक व माध्यमिक यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले. अधिवेशनाची सांगता पसायदान गायनसेवेने उत्साहात झाली.