पुणे । देशातील विद्यापीठे जागतिक दर्जाची व्हावीत यासाठी केंद्र शासन स्पर्धात्मक प्रोत्साहन देत आहे. या स्पर्धेत सरकारी व खाजगी क्षेत्रातील प्रत्येकी दहा संस्थांना चांगली संधी आहे. ही संधी साधण्यासाठी संस्थांनी परस्पर सामंजस्य आणि सहकार्य ठेवणे आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सोसायटीचे उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी याप्रसंगी उपस्थित होते.
आदान-प्रदान महत्वाचे
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शंभर शिक्षण संस्थांमध्ये स्थान मिळविण्याची क्षमता देशातील शिक्षण संस्थांमध्ये आहे. आपल्या संस्थेकडील चांगल्या गोष्टींचे इतर संस्थांशी आदान-प्रदान केल्यास त्याचा निश्चित फायदा होईल. शिक्षण क्षेत्रातील भष्टाचार हे एक आव्हान आहे, त्याला संस्थांनी थारा न देता, योग्य ठिकाणी तक्रार करून, आपले चांगले कार्य सुरू ठेवावे, असे डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी पुढे सांगितले.
संस्कारक्षम नागरिक ही काळाची गरज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा देशात दहावा क्रमांक लागतो. त्यामुळे पहिल्या 20 संस्थांमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा नक्की समावेश होईल. त्यासाठी संलग्न महाविद्यालांचा सहभाग महत्वाचा आहे, असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले. संस्कारक्षम नागरिक बनविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी अभ्यासक्रमात संस्काराशी संबंधित घटकांचा समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नका
केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) यांसारख्या संस्थांचे अधिकारी कॉलेज तपासणीसाठी आल्यावर त्यांना व्हिआयपी’ ट्रिटमेंट देऊ नका. अधिकार्यांनी नियमांना डावलून काही गोष्टींची मागणी केल्यास त्यांची तक्रार करून त्यांना कोर्टात खेचा, असा सल्ला डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी बुधवारी दिला. यावेळी 125 गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. चित्रा श्रीधरन यांनी सूत्रसंचालन तर उपप्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी यांनी आभार मानले.