शिक्षिकेच्या अरेरावीपणामुळे ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे

0

वाडा । वाडा तालुक्यातील निचोळे गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेला शिक्षिकेच्या अरेरावीपणामुळे ग्रामस्थांनी आज टाळे ठोकले. या शाळेतील शिक्षिका ज्योती भोईर त्यांच्याकडे पालकांनी कोणत्याही प्रकारे अर्ज केले नसतानाही त्यांनी विद्यार्थांचे दाखले बनवल्याने व त्यांची शालेय पुस्तके काढून घेतली. त्याचबरोबर विद्यार्थी हजर असताना ही हजेरीपटावर कोणतीही नोंदी केलेल्या नाहीत. याचा जाब विचारण्यासाठी काही महिला शाळेमध्ये गेल्या असता शिक्षिकेने अरेरावीची उत्तरे दिल्यामुळे संतापलेल्या महिलांनी व शाळा व्यवस्थापण कामिटीने अखेर शाळेला आज (19) टाळे ठोकले. तसेच ग्रामस्थांनी शिक्षिकेच्या विरोधात वारंवार तक्रार करूनही शिक्षण विभाग कोणतीही दखल घेत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शासनाच्या प्रसत्नांना हरताळ
एकीकडे शासन मराठी शाळा टिकाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच शाळांची गळती थांबविण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. मात्र, काही शिक्षकांमुळे या योजनांना व शासनांच्या प्रयत्नांना हरताळ असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शिक्षण विरोधी धोरण अवलंबणार्‍या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

शिक्षिकेची बदली करा
सदर शिक्षिका ह्या सतत फोन वर बोलत असते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत असल्याने त्या शिक्षिकेची लवकरात लवकर बदली करा. अन्यथा शाळेला कायमचे कुलूप लाऊ असा इशारा ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकर्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे

या शाळेमध्ये माझीही मुलगी शिकत आहे. मात्र शिक्षिका शाळेत सतत फोनवर बोलत असून त्यामुळे त्या मुलांना शिकवत नसल्याच्या वारंवार तक्रार माझी मुलगी करत होती. त्यामुळे शिक्षिकेची लवकर लवकर बदली करावी.
– योगेश पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत निचोले

गट विकास अधिकार्‍यांबरोबर चर्चा करून संबधीत शिक्षिकेची तात्पुरत्या स्वरुपात बदली करून त्यांच्या जागी दुसरा शिक्षक देणार आहोत.
-विलास शिंदे, विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग