जळगाव :महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्ज वितरणासंबंधी दाखल झालेल्या गुन्ह्यामागे राजकारण आहे असे काही वाटत नाही. कारण शिखर बँकेचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी राज्यातील दिग्गज सर्वपक्षिय नेत्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. यात जळगाव येथील राष्ट्रवादीचे नेते माजी खा. ईश्वरलाल जैन यांचा देखिल समावेश आहे. यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रीया जाणून घेतली असता ईश्वरलाल जैन यांनी सांगितले की, ही कारवाई राजकीय हेतुने प्रेरीत नाही. कारण तत्कालीन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कार्यकाळात ही बँक बरखास्त करण्यात येऊन 88 अन्वये चौकशी करण्यात आली होती. यात संचालकांवर 25 लाख रूपयांपर्यंतची जबाबदारी निश्चीत करण्यात आली होती. मात्र बँकेच्या संचालक मंडळाने कर्ज देण्याचे कर्तव्य केले. यात कुठेही भ्रष्टाचार नाही. हे बघण्याचे काम प्रशासनाचे होते. आम्ही पावणा देखिल घेतला नसल्याचे माजी खा. जैन यांनी सांगितले. तसेच या कारवाईमागे सरकार आहे असे मला वाटत नाही. कारण सरकारचे ऐकून न्यायालय काम करीत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई असुन त्याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही माजी खा. जैन यांनी सांगितले.
मी पवार साहेबांसोबत राहणार
राज्याच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ होत आहे. मात्र कोणी कुठेही गेले तरी मी पवारसाहेबांसोबतच राष्ट्रवादीत राहणार असल्याचे माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी सांगितले. चुकीच्या कामांवर पांघरूण घालण्यासाठी आणि भ्रष्टाचार लपविण्यासाठी काही जण उड्या मारत आहेत. मला मात्र कुठेही उडी घेण्याची गरज नाही. जिथे आहे तीथे सुखात आहे. माझ्यासोबत मनिषदादा देखिल राष्ट्रवादीतच असल्याचे माजी खा. जैन यांनी सांगितले.