शितळानगर चौकात सुरक्षासाधने उभारा, अन्यथा पूलाचे काम बंद करा

0

पोलिस अधिकार्‍यांची महामार्ग प्राधिकरणाला सूचना : चौकात अपघाताचे प्रमाण वाढले

देहूरोड । कात्रज बाह्यवळण मार्गावर सर्वाधिक वर्दळीच्या शितळानगर चौकात तातडीने सुरक्षा साधने उभारा, अन्यथा पूलाचे काम बंद करा, अशा सूचना देहूरोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगुळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना नुकत्याच दिल्या. येत्या दोनच दिवसांत सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्‍वासन संबंधितांकडून देण्यात आले आहे.

वेगनियंत्रक पट्टे मारा
कात्रज बाह्यवळण मार्गाचे सहापदरीकरणीचे रखडलेले काम सध्या अतिशय वेगात पुन्हा सुरू झाले आहे. शितळानगर येथील भुयारी पुलाच्या दोन्ही बाजुंची रूंदी वाढविण्यात येत असून त्यासाठी देहुरोडकडून शितळानगरकडे जाणारा भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या पुलाशेजारच्या चढरस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे. येथून महामार्ग ओलांडणार्‍या दुचाकीस्वार व पादचार्‍यांसाठी हा चौक अपघाती बनला आहे. त्यामुळे पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी तातडीने वाहतूक नियंत्रक दिवे लावण्यात यावेत. तसेच महामार्गावर दोन्ही बाजुंना शंभर मीटर अंतरावर वेगनियंत्रक पट्टे मारण्यात यावेत, अशा सूचना उपविभागीय पोलिस अधिकारी माडगुळकर यांनी केल्या आहेत.

अधिकार्‍यांची बैठक
यासंदर्भात नुकतीच संबंधित अधिकार्‍यांची देहूरोड पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अभियंता मिलींद वाबळे, रिलायन्स इन्फ्राचे ठेकेदार व तांत्रिक अधिकारी तसेच यासंदर्भात मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे यावेळी उपस्थित होते.

सुरक्षेला प्राधान्य द्या
नागरिकांची सुरक्षा हा प्रमुख विषय असून कुठलेही काम करताना या सुरक्षेच्या उपायांकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे यावेळी माडगुळकर यांनी सांगितले. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. तसे न झाल्यास या ठिकाणी भविष्यात होणार्‍या अपघातास संबंधित यंत्रणेला दोषी धरून कारवाई करण्यात येईल, असे पत्र पोलिसांच्यावतीने संबंधितांना देण्यात आले आहे. यावेळी कात्रज बेंगळुरू महामार्गवर विकासनगर येथे भूयारी मार्ग तसेच शिंदे पेट्रोलपंपाजवळ पादचारी पूल तयार करण्याच्या पूर्वीच्या मागणीच्या पुष्ट्यर्थ खासदार श्रीरंग बारणे यांचे शिफारस पत्र संबंधित अधिकार्‍यांना तंतरपाळे यांनी दिले.