शितळानगर पुलाखाली पाण्याचे तळे

0

देहूरोड : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शितळानगर रस्त्यावरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाण्याचे तळे साचले आहे. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात अनेक वाहने नादुरुस्त होत आहेत. स्थानिक प्रशासन आणि संबंधित वॉर्डच्या नगरसेविका या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात असून, या पुलाखालील पाण्याचा निचरा करण्यासाठी काही उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

दरवर्षाची समस्या
शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शितळानगर रस्त्यावरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ही समस्या दरवर्षाची आहे. मात्र, किमान पाऊस थांबल्यावर काही तासांतच पाण्याचा निचरा होत असतो. यावेळी मात्र, पाऊस उघडला तरी तीन दिवसांपासून पाण्याचे तळे जैसे-थे आहे. रात्री-अपरात्री कामावरून परतणारे नागरिक, ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी तसेच पहाटेच्या अंधारात शहरी भागात दूध घेऊन जाणार्‍या व्यावसायिकांचे या पाण्यामुळे हाल होत आहेत. अनेक जण या पाण्यातून वाचण्यासाठी शेजारच्या खडतर चढणीवरून वाहने नेतात. या जीवघेण्या पद्धतीने कात्रज बाह्यवळण रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याचा धोका पत्करतात.

जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
यासंदर्भात स्थानिक नगरसेवक आणि बोर्ड प्रशासन का लक्ष देत नाही, याचे कोडे उमगत नाही. या रस्त्याने दररोज सुमारे दीड हजार वाहने तसेच अडीच हजाराहून अधिक नागरिक प्रवास करतात. कॅन्टोन्मेंट प्रशासन मात्र, याकडे रितसर डोळेझाक करीत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. हा रस्ता दुरुस्त करण्याचे तसेच पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था करण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाची असल्याचे सांगून केवळ हात वर केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत स्थानिक नगरसेविका सारिका नाईकनवरे यांच्या वतीने माहिती देताना अमोल नाईकनवरे म्हणाले की, या वर्षी दोनवेळा या पुलाखालील गाळ बोर्डाच्या वतीने काढण्यात आला. तसेच पुलाखाली पडलेले खड्डेही दोन वेळा भरण्यात आले. या भागात पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था संबंधित रस्ता बांधतानाच करणे आवश्यक होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने सदोष काम केल्यामुळे नागरिकांना दरवर्षी या समस्येला तोंड द्यावे लागते, असे त्यांनी सांगितले.