जळगाव– राज्य शासनाने लाभार्थींना एप्रिल, मे, जून या तीन महिन्याचे अन्नधान्य एकाच वेळी दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लाभार्थी हे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानावर तीन महिन्याचे धान्य आले का ? अशी विचारणा वारंवार रेशन दुकानदारांकडे करीत आहे. मात्र पुरवठा विभागाने एकाच महिन्याचे धान्य देण्याचा व एप्रिल महिन्यापासून 5 किलो धान्य मोफत देण्याचा पावित्रा घेतला आहे.
कोरोना विषाणू रोगाचा सामना करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी देशात 21 दिवसासाठी लॉकडाऊन केला आहे. अशा परिस्थितीत देशातील गोरगरीब 80 कोटी जनतेला 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत देण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली होती. राज्य शासनाने एप्रिल, मे, जूनचे धान्य एकाच वेळी देवू अशी घोषणा केली होती. यामुळे रेशन धान्य घेणाऱ्यांमध्ये एकावेळी तीन महिन्याचे धान्य कसे कधी मिळेल याबाबत उत्सुकता आहे.
पाच किलो धान्य मोफत
केंद्र शासनातर्फे 5 किलो धान्याचे मोफत वितरण एप्रिल महिन्यापासून होणार आहे. मात्र तीन महिन्याचे एकाचवेळी धान्य दिले तर ग्राहकांना दुकानांतून नेणे शक्य होणार नाही. यामुळे एकाच महिन्याचे धान्य दर महिन्याला दिले जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.
तीन महिन्याचे धान्य आम्हाला प्राप्त झालेले नाही. फक्त माहे एप्रिल महिन्याचे धान्याचे चलन पास करण्यात आले. शासनाने मे, जून महिन्याचे धान्य दिल्यास आम्ही संबंधित लाभार्थ्यांना देऊ. त्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भेटून चर्चा करू.-अनिल अडकमोल
अध्यक्ष रेशन दुकानदार संघटना