भुसावळ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत किंवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना मे व जुन या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी निवडण्यासाठी आधारबेस डाटा कलेक्शन निष्पक्ष पद्धतीने करावा तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे परंतु अद्यापपर्यंत शिधापत्रिका प्राप्त न झालेले व्यक्ती, अन्न धान्याची गरज असलेल्या सामाजिक व आर्थिकदृष्टया दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर व प्रलंबित असलेल्या सर्व शिधापत्रिका धारकांनाच समाविष्ट करावे तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व इतर राज्य योजनेतील शिधापत्रिकाधारक यातून पूर्णपणे वगळण्यात यावे. ही संपूर्ण प्रक्रिया लवकर पूर्ण करावी ज्यामुळे खर्या लाभार्थ्यांना वेळेत धान्य पुरवठा होईल, अशी मागणी भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी भुसावळ पुरवठा विभागाचे अधिकारी सुभाष तायडे यांच्याकडे केली आहे.
शिधापत्रिकाधारक नसलेल्यांनी यादीत नाव तपासावे
विना शिधा पत्रिकाधारकांची यादी तयार होणार असून सदर यादी संबंधीत क्षेत्रातील तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील नगरपालिका कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी केली जाईल व नंतर केंद्रनिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधीत भुसावळातील सर्व तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द होणार आहे, पात्र लाभार्थ्यांनी या यादीत नावे तपासून घ्यावी असे आवाहन प्रा.धिरज पाटील यांनी केले आहे.
नागरीकांनी दक्षता घेणे गरजेचे
प्रत्येक वितरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी शारीरीक अंतराचे नियमांचे पालन करणे आवश्यक राहील पात्र लाभार्थींनी धान्य वितरण करण्यापूर्वी विहित हमीपत्र भरून घ्यावे व सोबत लाभार्थींचा प्रमाणित आधारकार्ड क्रमांक आवश्यक असेल किंवा शासनाकडून देण्यात आलेली कोणतेही ओळखपत्र लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.