शिबीरातून मिळाले कायदेविषयक मार्गदर्शन

0

रावेर । तालुका विधी सेवा समितीतर्फे कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालयात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी सेवा समिती अध्यक्ष डी.जी. मालविय, प्रमुख अतिथी म्हणुन सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) ए.पी. खानोरकर, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) आर.एल. राठोड, वकिल संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. योगेश गजरे, विधीतज्ञ अ‍ॅड. व्ही.पी. महाजन, विधी सेवा अधिकारी अ‍ॅड. डि.पी. गाढे उपस्थित होते. न्यायालयात उपस्थित असलेले एकुण 125 ते 150 नागरिक शिबिरात हजर होते. अ‍ॅड. व्ही.पी. महाजन यांनी प्रस्ताविक केले व अ‍ॅड. योगेश गजरे यांनी सुत्रसंचालन केले.

नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याची केली जाणीव
अ‍ॅड. एन.के. महाजन यांनी नागरिकांचे मुलभुत कर्तव्य या विषयावर उपस्थित असलेल्या पक्षकारांना माहिती सांगितली. अ‍ॅड. विद्या सोनार यांनी जेष्ठ नागरिकांचे अधिकार व शासनामार्फत त्यांना मिळणारी सवलत, तसेच जेष्ठ नागरिकांचे सामान्य कायद्याबाबत मार्गदर्शन केले. विधी सेवा अधिकारी अ‍ॅड. गाढे यांनी गरिबी निर्मूलन योजनेसाठी प्रभावी अंमलबाजवणी व शासनामार्फत गरिब लोकांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनांचे फायदे या विषयावर माहिती सांगितली. तसेच दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) आर.ए. राठोड यांनी तृतियपथियांबाबत कायदेशीर जागरुकता व त्यांचे अधिकाराविषयी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विधी सेवा समिती अध्यक्ष डी.जी. मालविय यांचे अध्यक्षीय भाषण झाले. आभार अ‍ॅड. तुषार माळी व अ‍ॅड. रमाकांत महाजन यांनी मानले.