शिमगा, शिवी आणि ओवी…!

0

होळी रे होळी, पुरणाची पोळी।
साहेबाच्या XXत बंदुकीची गोळी।
साहेब मेला संध्याकाळी…
यांसारखी आणि
होळीच्या गौर्‍या पांच पाच,
चल ग पोरी नाच नाच…
अशी कवनं होळीच्या दिवशी घुमायची, गळ्यात ढुमकं बांधून जाम धांगडधिंगा व्हायचा. आता काळाच्या ओघात हे वातावरण फारसं दिसत नाही. गाण्याच्या भेंड्या जशा लावल्या जातात, तशा शिव्यांचा भेंड्या लावल्या जात होत्या. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. होळीच्या काळात शिव्यादेखील ‘बुरा न मानो होली है’ असं म्हणत म्हटल्या जात. शिवी आणि ओवी या दोघात एका अक्षराचा काय तो फरक! ओवी संतांची म्हणजे सज्जनांची आणि शिवी दुर्जनांची, असा सर्वसाधारण समज आहे.

माउली म्हणजे ज्ञानेश्‍वर महाराज! अमृताशी पैजा जिंकणारी स्पर्धा करेल, अशी शब्दकळा त्यांना अवगत होती. ज्ञानेश्‍वरांच्या या शब्दकळेत शिव्या होत्या का? याचा शोध मात्र घेतला गेलाय. या माउलीनं कुणाला दुखवण्याचा प्रश्‍नच नव्हता. पण ज्ञानेश्‍वरांनी विषयलंपटांना आपल्या शैलीतून शिव्या दिल्या आहेत. असं काही विद्वानांनी शोधून काढलंय. स्व. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी ‘शिवी आणि समाजेतिहास’ या त्यांच्या लेखात अगदी शिवीच्या उगमापासूनचा इतिहास सांगितलाय. मराठीतल्या अनेक शिलालेखात गाढवांचा उपयोग करून शिव्या दिल्याचे दिसते. याला गधेगाळ असे नाव असून, हे गधेगाळ शब्द आणि शिल्प दोन्ही रूपांत शिलालेखातून साकारलेले दिसते. आई, बहिणींचा आणि गाढवांचा संबंध शब्दरूपात आणि शिल्परूपात व्यक्त करण्याची ही परंपरा केवळ प्राकृत नाही. सुसंस्कृत आहे. वसईतल्या एका शिलालेखात गाढवांवरोबर घोड्यांचाही वापर करण्यात आलेला आहे. रा.चिं. ढेरे यांनी आपल्या लेखात ज्ञानदेवांनी ‘खर’ या दृष्टांताच्या परिच्छेदात जे सांगितलंय त्यातला काही भाग हा असा आहे. शिमग्याच्या काळात उगाच अटकमटक फास्टफूड वळणाच्या शिव्या खूप ऐकायला मिळतात. पण माउलींची शैली ती माउलींची शैली. ज्ञानदेवांच्या ‘खर’ या दृष्टांतात ढेरे म्हणतात, ’साच आणि मवाळ, तसेच मितले आणि रसाळ’ असे अमृताकल्लोळासारखे शब्द त्यांच्या मुखातून स्रवत होते ते ज्ञानदेव, ऋजुता आणि मधुरता यांचा प्रकर्ष ज्यांच्या वाणीत आहे ते ज्ञानदेव, आपल्या रसनेला शिव्यांचा स्पर्श होऊ देणार नाही, असे आपणास वाटणे साहजिक आणि स्वाभाविक आहे. विशेषतः ज्यांनी सात्विक संतापही कधी जवळ केला नाही, खळाची खळाळता सांडावी याचसाठी ज्यांनी करुणेची शिंपण केली, ते कुणाला शिव्या देतील, अशी कल्पनाही करवत नाही. परंतु, आपल्या या अपेक्षेला ज्ञानदेवांच्या मृदू, मधुर वाणीनेही एक सौम्यसा धक्का एकदा दिलेला आहे. तेराव्या अध्यायात अज्ञान विवरणप्रसंगी विषयासक्तीचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी म्हटले आहे.

खरी टेंको नेंदी उडे।
लातौनी फोडे नाकाडे।
तर्‍हा जैसा न काढे। माघौता खरू॥
तैसा जो विषयांलागीं।
उडी घाली जळातीये आगी।
व्यसनाची अंगी। लेणी मिरवी
(गाढवीन गाढवाला स्पर्श करू न देता, उसळून मागील लाथेने त्याचे नाकाड फोडते, तरीही ज्याप्रमाणे गाढव मागे सरत नाही, त्याप्रमाणे विषयासक्तपुरुष जळत्या आगीसारख्या स्त्री देहाचा उपभोग घेण्यासाठी झेपावतो आणि त्या भोगातून प्राप्त होणारी संकटेही शरीरावरील अलंकारासारखी मिरवतो…)

हा दृष्टांत म्हणजे ज्ञानदेवांनी विषयलंपटांना दिलेली एक तिखट शिवीच आहे. ‘लोकसाहित्याचा शोध आणि समीक्षा’ या ढेरे यांच्या या पुस्तकातला लेख त्यासाठी महत्त्वाचा वाटतो. शिव्या देण्यासाठी त्या याव्या लागतात आणि त्या नुसत्या याव्या लागत नाही, तर त्या कळाव्याही लागतात. त्याशिवाय त्यात ठसका आणि झटका येत नाही. मोठमोठ्या विद्वानांनासुद्धा शिवी कळत नाही. ज्ञानदेवासारखे शब्दप्रभू जेव्हा शिवी देतात वा कुणी दिलेली शिवी सांगतात, तेव्हा तर, ज्ञानेश्‍वरीची वर्षानुवर्षे पारायणे करणारे, ज्ञानेश्‍वरीवर प्रवचन ठोकणारे आणि समीक्षक म्हणून सदासर्वदा काहीतरी खरडणारेसुद्धा साफ चकतात. त्यांना त्या शिवीतलेसुद्धा कळत नाही. तुम्हाला गंमत वाटेल, पण ज्ञानेश्‍वरीत एक महान शिवी असल्याचं ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड यांनी शोधून काढलंय. ही महान शिवी स्पष्ट करून सांगण्यासाठी त्यांनी एक लेखच लिहिलाय. ‘ज्ञानेश्‍वरीतील लौकिकसृष्टी’ या पुस्तकात या लेखाचा समावेश आहे. ज्ञानदेवांची महान शिवी सांगताना त्यांनी ज्ञानदेवांच्या काही लहान शिव्यांचे दाखलेही ‘ज्ञानेश्‍वरी’मधून शोधून काढलेत. त्यात ढेरे यांनी शोधलेला ‘खर’ दृष्टांत नाही. पण राजा धृतराष्ट्राला ज्ञानेश्‍वरांनी म्हैस म्हटलंय, ही एक शिवीच असं धोंड म्हणतात. असूर चुकूनही खरं बोलणार नाहीत. हे सांगताना ‘ज्ञानदेवांनी त्यांच्या तोंडाला चक्क ुु म्हटलं आहे’, असं धोंड म्हणतात आणि मग ज्ञानदेव तो अशिष्ट शब्द न उच्चारता नागरूपात तसं सांगतात, असा खुलासाही करतात. महात्मा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर, अच्युतराव कोल्हटकर, भालाकार भोपटकर, दिनकरराव जवळकर, प्रबोधनकार ठाकरे आदी खानदानी घराणी या क्षेत्रात मराठदेशी होऊन गेले आहेत. प्रत्येक गोष्ट संस्कृती, परंपरेच्या अभ्यासासाठीच असते. असे भासवणार्‍या चमनगोट्यांना स्मरून सांगतो. शिवीगाळीसारखा निंद्य सामाजिक आचारही सांस्कृतिक परंपरेचा वेध घेण्यासाठी कसा अभ्यासनीय आहे हे यावरून लक्षात यावे म्हणून शिमग्याच्या निमित्ताने हे कवित्व…!

सोनोपंत दांडेकर, साखरे महाराज, म. शं. गोडबोले अशा माउलींच्या अभ्यासकांनाही ज्ञानेश्‍वरीत शिवी गवसली नाही. त्यांनी त्याचा थातूरमातूर अर्थ लावला, असं म. वा. धोंड यांचे म्हणणे आहे. शिव्या देणार्‍यांना ’तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या कशा झटपट तोंडातून निघतात, हे सांगायला नको. ’तुझ्या आईला’ ही सुरुवात आणि तीन शब्दांचा शेवट या आठ अक्षरात निरनिराळी जनावरं पतिखेरीज दुसरा पुरुष अथवा जे सुचेल, वाटेल ते घालून शिव्यांची फैरी झाडली जाते. धोंड याला ’कुमार क्रोध क्षोभण’ मंत्र म्हणतात. कुमार म्हणजे पुत्र आणि बीजाक्षरे म्हणजे ’तुझ्या आईला’ या शब्दापासून सुरू होणार्‍या शिव्या! असे धोंडांच विवेचन आहे. ते प्रत्यक्षात वाचल्याशिवाय शिव्या आणि त्याचा दर्जा याचे ज्ञान प्राप्त होणार नाही. अशिष्ट भाषा न वापरता शिष्ट मंडळी एखाद्याचा कसा आणि किती उद्धार करतात हे ह्या शिमग्याच्या मुहूर्तावर समजून घ्यायला काय हरकत आहे?

हरीश केंची – 9422310609