शिमलाजवळ बस नदीत कोसळली; 45 प्रवासी ठार

0

शिमला : हिमाचल प्रदेशातील शिमला येथे बुधवारी टोंस नदीत एक प्रवाशी बस कोसळली. या भीषण अपघातात 45 प्रवासी ठार झाले. मृतांमध्ये 10 महिला आणि मुली, तसेच तीन लहान मुलांचा समावेश आहे. एनडीआरएफचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. तत्पुर्वी स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केले होते. सायंकाळी उशीरापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते. अन्य पाच मृतदेह वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चौकशीचे आदेश
शिमला जिल्ह्यातील सुदूर नेरवा परिसरात हा भीषण अपघात झाला. सिरमौर जिल्ह्यालगतच्या परिसरातील टोंस नदीत बस कोसळल्याने 45 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त बस 250 मीटर खोल दरीत कोसळल्यानंतर नदीत पडली. बचावपथकांनी 40 प्रवाशांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. तर इतर पाच जणांचे मृतदेह वाहून गेल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर बस कंडक्टर फरार झाला आहे. तुलसीराम असे त्याचे नाव आहे. एसएचओ नरेंद्र सिंग यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

अधिकार्‍यांच्या माहितीमध्ये तफावत
शिमला येथील डेप्युटी कमिश्‍नर रोहन चांद यांनी सांगितले की, बसमध्ये 56 प्रवाशी होते. आतापर्यंत 45 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 11 जण बेपत्ता आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु असून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. शिमला येथून 190 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, येथील जिल्हाधिकार्‍यांनी बसमध्ये ड्रायव्हरसह 46 जण असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अधिकार्‍यांच्या माहितीमध्ये तफावत दिसून येत होती.