शियाव्होनने जिंकली क्लॅरो ओपन स्पर्धा

0

कोलंबिया । माजी फ्रेंच ग्रँडस्लॅम विजेत्या फ्रान्सेस्का शियाव्होनने कारकिर्दीतील आठवे अजिंक्यपद मिळविताना येथे झालेली क्लॅरो ओपन कोलसानिटास स्पर्धा जिंकली. अंतिम फेरीत तिने चौथ्या मानांकित लारा ऍरुआबॅरेनाचा 6-4, 7-5 असा पराभव केला. 36 वर्षीय शियाव्होनला या वर्षात डब्ल्यूटीए स्पर्धेतील एकही सामना जिंकता आला नव्हता. मात्र या स्पर्धेत तिने शानदार कामगिरी करताना विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेत तिने फ्रेंच ओपन उपांत्य फेरीत खेळलेल्या किकी बर्टेन्स व अन्य तीन मानांकित खेळाडूंना हरविण्याचा पराक्रम केला. गेल्या वर्षी झालेल्या रिओ ओपननंतर तिने मिळविलेले हे पहिलेच जेतेपद आहे. मोसमानंतर निवृत्त होणार असल्याचे तिने जाहीर केले आहे. जेतेपदामुळे तिच्या मानांकनात सुधारणा होणार असून ती 168 वरून टॉप 100 च्या जवळपास पोहोचली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्याची तिला संधी आहे.