जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी राबविला स्तुत्य उपक्रम
शिरगाव : सोमाटणे विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वेगळा ‘चिमुकला’ आठवडी बाजार भरविण्यात आला होता. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन शाळेच्यावतीने करण्यात आले होते. या आठवडी बाजाराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य स्वाती कांबळे यांच्या हस्ते करण्यात आल्याचे शाळेचे मुख्याध्यापक देवीप्रसाद तावरे यांनी सांगितले. या चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची, भाज्यांची, विविध वस्तूंची 30 दुकाने विद्यार्थ्यांनी लावली होती. यामधे वडापाव, भेळ, कच्ची दाबेली, धपाटे, सरबत, सामोसा, भजी, पोहे, इडली सांबर, मंच्युरियन, ज्युस, शिरा, गुलगुले, साबुदाणा वडे तसेच स्टेशनरी, कटलरी व फळांच्या दुकानांचा यात समावेश होता.
ग्रामस्थांनी केले कौतुक
हे देखील वाचा
विविध खाद्यपदार्थांची खरेदी व विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसांडून वाहत होता. विद्यार्थ्यांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही आनंद घेतला. ग्रामस्थांनी शिक्षकांच्या या क्रियाशीलतेचे भरभरून कौतुक केले. या बाजारातील उत्साह व लगबग पाहून पालकांनी व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या शालेय आठवडी बाजारात एका दिवसात सुमारे पाच हजार रूपयांची उलाढाल झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य स्वाती कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशा गायकवाड, शिक्षक आशा काळोखे, उज्वला रासेराव, मंगल पडवळ, एस.एस.जोशी, शुभदा आतकरी, मंगल मुर्हे, वैशाली तापकीर, आलीशा शेख, रावसाहेब शिरसट, परविन शेख, मोबीना शेख, जया काशिद, प्रशांत निघोजकर, मनिषा कांबळे तसेच शाळा व्यवस्थापन सदस्य,पालक व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
व्यवहार ज्ञान कळते
याविषयी शाळेचे मुख्याध्यापक देवीप्रसाद तावरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळते. आठवडे बाजारामुळे मुलांना आपली संस्कृती समजते. मुलांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवावयास मिळतात गणिती क्रिया स्वतः करता येतात. त्यामुळे स्वावलंबन व चिकित्सक वृत्ती लागेल वाढीस लागते. तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते. विशेष म्हणजे यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागण्यास मोलाची मदत होते.