शिरपुरचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर!

0

शिरपूर । शिरपूर शहरात दिवसा ढवळ्या घरात घुसून खून करण्याची घटना घडली असून चार दिवस उलटूनदेखील खुन करणार्‍या आरोपींना पकडण्यात शिरपूर पोलीसांना यश येत नसल्याने शिरपूरचा कायदा व्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर येऊन ठेपल्याचे चित्र आहे. शहरातील गणेश कॉलनीतील प्लॉट नंबर 1 मध्ये राहणार्‍या नफीसाबी दिदार खाटीक या महिलेचा भर दुपारी खून करण्यात आल्याची घटना घडली होती आरोपीनी खुन करुन घरातील सी सीटिव्हीचे डीव्हीआर काढुन टाकून पुरावा नष्ट केला होता. मयत नफीसाबी यांचा खुन होवुन तब्बल चार दिवस झाल्यानंतर देखील पोलिसांकडून आरोपीना शोधण्यात यश आलेले नाही हा खून चोरीच्या उद्देशाने झाला नसुन खून करणारा त्या घराबाबत पूर्ण माहितगार असुन वयक्तीक उद्देशाने खून झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

नफिसाबी यांच्या खुनामागचा उद्देश काय ?
दिदार उर्फ राजूशेट भिकारी खाटीक हे एक व्यावसायीक असून त्यांचा होलसेल अंडे, बोंबील विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी पोलीसांना दिेलेल्या माहितीनूसार त्यांची कुणाशीही दुश्मनी नसल्याने कुणावरही संशय नसल्याचे म्हटले आहे. तर घरातून कोणतीही किमती वस्तू चोरी झालेली नाही म्हणून खुनी हे चोरी करण्याच्या उद्देशाने आले नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे नफीसाबी यांचा खून करण्यामागे खुनींचा उद्देश काय होता? असा सवाल शिरपूरकरांच्या ओठावर आहे.

शिरपूर पोलिसांपुढे खुले आव्हान
तत्कालीन पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या कार्यकाळात शिरपूर शहरातील तसेच तालुक्यातील अनेक अवैध धंदे करणार्‍यांवर कारवाई झाली. मात्र अवैध धंद्यांना कायम स्वरूपी लगाम घालण्यात यश आले नाही. दत्ता पवार यांची बदली करून त्यांच्या जागेवर शिरपूर पोलीस स्टेशनची धुरा पोलीस निरीक्षक वडनेरे यांनी सांभाळल्यापासून पहिलीच कारवाई शिरपूरातील बनावट दारूच्या कारखान्यावर करून कारखाना उध्वस्त केला. त्यामुळे शहरासह तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले होते. तालुक्यातील नागरिक तालुक्यातील अवैध धंदे संपुष्टात येवून तालुक्यात कायदा सुव्यस्था नांदावी अशी आशा वडनेरे साहेबांची धडाडीची इन्ट्री पाहून करत होते. दरम्यान शिरपूर शहरातील नफीसाबी खाटीक यांच्या खुनामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक वडनेरे व शिरपूर पोलीस प्रशासनासमोर मारेकर्‍यांनी खुले आव्हान दिल्याची चर्चा आहे. तर शिरपूर पोलीस या खुनाचा तपास लावतील का? असा प्रश्‍न नागरिकांमधुन उपस्थित होत आहे.

सिसीटीव्ही कॅमेर्‍याची रेकॉर्डींग नष्ट केल्यामुळे आरोपींना पकडण्यात अडचण निर्माण झाली आहे. मात्र सर्व बाजुंनी खुनाचा तपास सुरू असून संशयित भागाकडे पथक रवाना करण्यात आले आहेत. थोडा उशीर लागेल मात्र मारेकर्‍यांना जेरबंद करण्यासाठी शिरपूर पोलीस तत्पर आहेत.
– विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक