नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून मागील पंधरवड्यात शेेतकरी संपाच्या पडलेल्या ठिणगीचा वणवा थेट जवळच असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील कमखेडा फाट्यावरून शिरपूर तालुक्यातील हद्द ओलांडत मध्य प्रदेशात जावून पोहोचल्या नंतर देखील शिरपूर तालुक्यातील शेतकर्यांना त्याची माहिती नसल्यागत सर्व व्यवहार सुरळीत चालूच राहिले यावरून येथील शेतकर्यांची ही अनास्था म्हणावी की हतबलता हे देखील समजू शकत नाही. येथील शेतकर्यांसारखा सहनशिलता असलेला शेतकरी राज्यात कोठेही शोधून सापडणार नाही. त्यातच या शेतकर्यांच्या जीवावर राज्य करणार्या आणि तालुक्यात सत्तेत असणार्या पंरतू सरकारच्या विरोधी असलेल्या येथील काँग्रेस पक्षाने देखील त्यांच्याकडे पाठ फिरविल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.
नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून सुरू झालेला हा शेतकर्यांचा संप त्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट्रभर याचे लोण पसरत गेले. शेतकर्यांच्या संघटीतपणाचे प्रदर्शन पुर्ण राज्याने पाहिले. मात्र या संपाचा वणवा पेटत असतांना त्याचे लोण हे शिरपूर तालुक्याची हद्द ओलांडत सिमेलगत असलेल्या मध्य प्रदेशापर्यंत पोहोचले. मात्र येथील शेतकरी हा हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून गप्प बसला होता. कदाचित त्यांना कर्जमाफी नको असावी शेत मालाला हमीभाव नको असावा एवढे ते सधन आहेत की काय? किंवा तुम लढो हम कपडे संभालते है ! अशातला प्रकार असावा का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील साखर कारखाना बंद झाल्यानंतर त्या चिमणीतील धुर हा बंद झाला असला तरी येथे पैशांचा पुर असल्यागत चित्र निर्माण झाले आहे. समृद्धीचा बुरखा पांघरल्याने दाखविता येत नसल्यागत परिस्थिती येथे तयार झाली आहे. शिरपूरचे नाव हे राज्या मार्गे देशपातळीवर पोहोचल्याचा हा परिणाम असू शकतो परंतु फक्त नावाने शेतकर्यांची पोट भरू शकत नाही आपल्या हक्कासाठी लढणे देखील तितकेच महत्वाचे आहे. शेतकर्यांवर होत असलेल्या अन्यायाची चर्चा दबक्या आवाजात येथे केली जाते. मात्र प्रत्यक्षात होत असलेल्या आंदोलनाकडे पाठ फिरविली जाते. हा प्रकार काही प्रथमच येथे पाहण्यास मिळाला नाही शेतकर्यांशी निगडीत असलेल्या संस्था काही बंद झाल्या काही रसातळाला गेल्या तरी देखील त्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणेच पसंत केलेले आहे. वास्तविक शेतकर्यांचा संप हा काही स्थानिक नेत्यांचा नव्हता. तरी देखील नेमके शेतकरी हा आंदोलनापासून लांब राहिला. शेतकर्यांनी उठावे शासकीय व खाजगी मालमत्तेची नासधूस करावी याचे समर्थन होवूच शकत नाही. मात्र आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणे क्रमप्राप्त आहे. भविष्यात शासनाने शेतकर्यांना जर कर्जमाफी दिली तर येथील शेतकरी ते नाकारूच शकत नाहीत. मग आपल्याच समव्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहण्यास काही एक हरकत नव्हती. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या गुळमुळीत अशा गप्पा तालुक्यात चौका चौकात शेतकरी मारतांना दिसत होते. मात्र प्रत्यक्ष कृती ही शुन्य होती. तालुक्यातील शेतकर्यांची एकुणच भूमिका आणि मानसिकता पाहता शिरपूर हे महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्रा बाहेर असा प्रश्न पडण्याइतपत स्थिती रसातळाला गेली आहे. येथील शेतकरी अडचणी भोगेल कष्टाला सामोरे जाईल प्रसंगी अन्याय सहन करेल परंतु स्वाभिमानाने ताठ मान करत लढायला सिद्ध होणार नाही. तालुक्याची मानसिकता कुठे दडली आहे. आपल्याच भाऊबंदांच्या आणि पर्यायाने आपल्याही दु:खाला वाचा फोडण्याची तयारी त्यांची दिसत नाही. राजकीय पक्षाचा आदेश आला की, हातातील काम सोडून कार्यक्रमाला जायचे त्यांचा जयजयकार करायचा हे कर्तव्य मात्र ते इमाने इतबारे निभावतात हे दुर्देवच म्हणावे लागेल. शेतकर्यांचे आंदोलन राज्यभर सुरू असतांना येथील शेतकरी विकास फाऊंडेशन, बळीराजा संघटना, सत्यशोधक जनआंदोलन , शिरपूर वकील संघटना , शिवसेना व राष्ट्रवादी यांनी शेतकरी संपाला पाठींबा दिला मात्र तेथे देखील शेतकर्यांनी हजेरी लावली नाही. राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेसच्या नेते व पदाधिकार्यांनी संपाला पाठींबा देत काही ठिकाणी आंदोलनात सहभाग नोंदविला मात्र गेले अनेक वर्ष येथील शेतकर्यांच्या जीवावर राज्य करणार्या येथील काँग्रेसने या आंदोलनाकडे पाठ फिरविली. 31 ऑक्टोबर रोजी कर्जमाफी दिली जाईल ही कर्जमाफी सर्वात मोठी असेल असा दावा मुख्यमंत्र्यांकडून नुकताच करण्यात आला. त्यात देखील अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. प्रत्येक जण या कर्जमाफी बाबत आपआपले मत मांडत असतांना ही कर्जमाफी देण्यासाठी सरकारने तत्परता दाखवावी. त्यामुळे तरी राज्यातील शेतकरी सुखी होण्यास मदत मिळू शकते नाहीतर पुन्हा त्याच घोषणा तेच आश्वासन यातच या सरकारचा कार्यकाळ पुर्ण होईल त्यानंतर होणार्या निवडणूकीत पुन्हा आश्वासन देवून राजकारणाचे सारीपाट खेळले जाईल यात भरडला जाईल तो फक्त शेतकरीच …!
राजेंद्र पाटील, शिरपूर – 9403430792