खान्देशातील लाचखोरांवर संक्रांत : जळगाव व धुळे विभागाच्या कारवाईने खळबळ
जळगाव- जात प्रमाणपत्रासाठी आठ हजारांची लाच स्वीकारणार्या अमळनेर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र आधार वाडे (आंबेडकर नगर, चोपडा) सह शिरपुरातील दुय्यम निबंधक रवींद्र पवारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी मुसक्या आवळल्या. खान्देशात दोन ठिकाणी झालेल्या लाचखोरांवरील कारवाईचे नागरीकांमधून स्वागत होत आहे तर या कारवाईमुळे लाचखोर अधिकार्यांमध्ये धडकी भरली आहे.
शिरपूरातील लाचखोर दुय्यम निबंधक जाळ्यात
शिरपूर- शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक रवींद्र रायाजी पवार यांना वकीलाकडून पाचशे रुपयांची लाच घेताना धुळे एसीबीने शुक्रवारी दुपारी अटक केली. तक्रारदार वकीलाच्या पक्षकाराचे दत्तक पत्र रजिस्टर करण्यासाठी आरोपी रवींद्र पवार यांनी शासकीय चलना व्यतिरीक्त 500 रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत धुळे लाचलुचत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळला रचण्यात आला. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर व सहकार्यांनी सापळा यशस्वी केला. दरम्यान, आरोपी पवार यांच्या मालेगाव येथील घराची झडती नाशिक येथील एसीबीच्या पथकाने घेतली मात्र त्यात काही विशेष आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांचा कारवाईत सहभाग
धुळे एसीबीचे उपअधीक्षक शत्रृघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश भोरटेक, निरीक्षक महेश देसले, हवालदार नरेंद्र कुलकर्णी, जयंत साळवे, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, प्रशांतचौधरी, संतोष हिरे, सतीश जावरे, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, सुधीर सोनवणे, प्रकाश सोनार, संदीप कदम, सुधीर मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
अमळनेर प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात
अमळनेर- जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी आठ हजारांची लाच मागणार्या अमळनेर प्रांधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून राजेंद्र आधार वाडे (आंबेडकर नगर, चोपडा) यास जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रंगेहाथ अटक केली. अमळनेर शहरातील 31 वर्षीय तक्रारदाराच्या मुलाला जात प्रमाणपत्र हवे असल्याने आरोपी वाडे याने आठ हजारांची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर जळगाव लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. आरोपी वाडेविरुद्ध एसीबीच्या पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.