शिरपूर। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. संस्थेतील असंख्य विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केल्याची बाब शिरपूरकरांसाठी भूषणावह आहे. यापुढे गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व कलावंत विद्यार्थ्यांच्या उज्ज्व्ल भविष्यासाठी अनेक योजना आखून मोठया प्रमाणात त्यांना यशोशिखरावर पोहचविण्यासाठी प्रयत्न् होतील असे प्रतिपादन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी केले.
विविध खेळांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन
शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पचा समारोप भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी सुटटीच्या कालावधीत मनसोक्त आनंद लुटला. आर.सी.पटेल मेन बिल्डींग येथे समर कॅम्पचा समारोप करण्यात आला. यावेळी क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, पालक, खेळाडू, विद्यार्थी, सर्व प्रशिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचलन राकेश बोरसे यांनी केले. पालकांमधून शालिनी सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आर.सी.पटेल समर कॅम्पमध्ये सुमारे 900 खेळाडूंनी सहभाग घेतला. क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, स्केटींग, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॅण्डबॉल, रायफल शुटींग, सॉफ्टबॉल / बेसबॉल, बॉक्सिंग, ज्युडो कराटे या खेळांसह संगित प्रकारात तबला, दरबुका, किबोर्ड-हार्मोनियम, नृत्य् प्रकारात मुलींसाठी सेमी क्लासिकल इंडियन फोक डान्स्अशा विविध प्रकारात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.