पोलिसांच्या गस्ती पथकासमोरून संशयीत गेल्याने तसेच दुचाकीवरील ‘दगडी चाळ’ नावाच्या उल्लेखाने पटली ओळख
यावल- यावल-चोपडा रस्त्यावरील भारत डेअरीजवळील हतनूर वसाहतीसमोर हरभर्याची वाहतूक करणार्या ट्रक (एम.एच.18 बी.ए 2424) वर चौघा संशयीतांनी दगडफेक करीत ट्रक चालकाला 48 हजार रुपयात लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली होती. घटनेनंतर चोरटे सुसाट वेगाने पसार झाले होते तर पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिसांना या तरुणांबाबत संशय आल्याने तसेच ट्रक चालकाने घटनेनंतर पोलिसांना सांगितलेल्या वर्णनानुसार अवघ्या काही तासात पोलिसांनी शहरातीलच चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. या चोरट्यांनी शहरात आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून पोलिस कोठडीचा हक्क राखून आरोपींना 3 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ट्रकचा पाठलाग करून केली लूट
अंकलेश्वर- बर्हाणपूर राज्य मार्गावरून यावल शहराबाहेरू चोपड्याकडे ट्रक जात असताना दुचाकीवर आलेल्या चौघांनी ट्रकवर बेफाम दगडफेक करीत ट्रक अडवला होता तर चालकाच्या कॅबीनमध्ये शिरून चोरट्यांनी 48 हजारांची रोकड लांबवली होती. या घटनेनंतर ट्रक चालक तथा फिर्यादी अनिसखान अब्दुल रशीद (51, चालक, रा.मराठे गल्ली, शिरपूर, जि.धुळे) यांनी यावल पोलिसात धाव घेत झालेली घटना व चोरट्यांचे वर्णन सांगितले होते तर चोरीनंतर चोरटे सुसाट वेगाने शहराकडे निघाले असतानाच यावल पोलिसांच्या गस्तीपथकाला संशय आला होता. फिर्यादीच्या वर्णनावरून संशयीत आरोपी कल्पेश राजू भोई (21, रा.श्रीराम नगर, यावल), लिलाधर उर्फ गणेश राजू कोलते (19, रा.वाणी गल्ली, यावल), अक्षय गोपाळ चौधरी (21, विश्वज्योती चौक, यावल), गणेश अरुण कोळी (21, भवानी पेठ, यावल) यांना अटक करण्यात आली. आरोपींना यावल न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीचा हक्क राखून 3 सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी न्यायदंडाधिकार्यांसमोर आरोपींची ओळख परेड होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपींची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई यावलचे निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक योगेश तांदळे, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे, विकास सोनवणे, राहुल चौधरी, सुशील घुगे, गणेश मनुरे आदींच्या पथकाने केली. दरम्यान, संशयीत आरोपींनी शहरातील विस्तारीत भागातही काही चोरी केल्या असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.