शिरपूरकरांना मॉर्निंग वॉक पडला महाग;पोलिसात गुन्हा दाखल

0

शिरपूर । कोरोनाचा प्रसार व प्रार्दुभाव रोखण्यासाठी सध्या देश लॉकडाऊन आहे. परंतु काही अतिशहाणे लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करतांना दिसून येत आहेत.असेच उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील २४ जणांना मॉर्निंगवॉक चांगलेच महागात पडले आहे.

कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन केले. जिल्हा व राज्य सीमा बंद केल्या.प्रशासन कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहेत. जनजागृती करीत आहे. पण काही लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करून शहरात काम नसतांना फिरत आहेत. पोलिसांकडून प्रसादही मिळत आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करतांना दिसत आहे. सकाळी मॉर्निंगवॉकला बाहेर पडत आहेत. प्रशासनाच्या प्रयत्नाकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याने प्रशासनाने कार्यवाहीचा बडगा उगारला असून शिरपूर शहरात मॉर्निंगवॉकला बाहेर पडलेल्या २४ जणांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापुढे देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.