शिरपूर: शिरपूर-वरवाडे नगरपरिषद क्षेत्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेल्या काही जीवनावश्यक व कार्य आस्थापना शासनाच्या आदेशानुसार (mission Begin again) गुरुवारी, ५ जूनपासून काही अटीशर्थीच्या अधीन राहून सुरू करण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
शासनाच्या ३१ मे २०२० रोजीच्या निर्देशानुसार ५ जूनपासून शहरातील कटिंग सलून, ब्यूटी पार्लर,हाॅटेल, बार तसेच प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील जीवनावश्यक बाबींच्या आस्थापना आणि कार्य सुरू करण्यात येत आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी २ या कालावधीत किराणा दुकाने, स्वस्त धान्य विक्रीची दुकाने,भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने, कृषी विषयक सर्व प्रकारच्या आस्थापना, छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट/कव्हरची दुकाने, वखार(सॉ मिल), कुलर,एसी, पंखे साहित्याची दुकाने, पेट्रोल पंप,बांधकाम विषयक आस्थापना, सर्व्हिस सेंटर, गॅरेज, वर्कशाॅप, केवळ दुरुस्ती व देखभाल प्रयोजनार्थ आस्थापना, प्लंबर, इलेक्ट्रीशियन्स, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ,आदी आस्थापना सुरू करण्यात येणार आहेत. दूध विक्रेत्यांसाठी सकाळी ६ ते रात्री ८ ह्या वेळेत शहरात दूध वाटप करू शकणार आहेत.
सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक
वरील सर्व नमूद आस्थापना धारकांनी फिजीकल डिस्टन्सिंगचा/मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. तसे आढळून न आल्यास दिलेली सूट तत्काळ रद्द करण्यात येईल. याकाळात रुग्णालये, औषधे विक्रीची दुकाने, सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा व त्या अनुषांगिक सेवा, बँक यंत्रणा या अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.याकाळात नागरिकांनी होम डिलीव्हरी पध्दतीस प्राधान्य देण्यात यावे. तसेच मास्क लावणे बंधनकारक असून सार्वजनिक ठिकाणी पण तंबाखू, मद्य सेवन करणे, थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे.
राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्री ९ ते सकाळी ५ या कालावधीत संपूर्ण संचारबंदी आदेश लागू केलेले आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्यात यावे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (३) व भारतीय दंड संहिता (४५/ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य त्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील, याची नोंद घ्यावी, असे आदेश प्रांताधिकारी विक्रमसिंग बांदल, तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल शिरपूर यांनी केले आहे.