शिरपूर: शहरासह तालुक्यात कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी 17 जूनपासून शिरपूर-वरवाडे नगर परिषद क्षेत्रात पाच दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याच्या निर्णयाला शहरातील व्यापारी संघटनांनी प्रचंड विरोध केला आहे. यासोबतच ‘जनता कर्फ्यू’त सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने अर्थचक्र सावरण्यासाठी लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतलेला असतांना ‘जनता कर्फ्यू’च्या नावाने शहर बंद करून व्यवहार व बाजारपेठ बंद करण्यास शहरातील व्यापारी संघटनांनी प्रचंड विरोध केला आहे. प्रशासनाला ‘जनता कर्फ्यू’ रद्द करण्याविषयीचे निवेदन दिले.
“शहरातील लोकप्रतिनिधी व जनतेने, जनतेच्या आरोग्यासाठी 17 जूनपासून पाच दिवस ‘जनता कर्फ्यू’ पुकारला आहे. त्यामुळे या ‘जनता कर्फ्यू’त कोणी सहभागी व्हावे आणि कोणी सहभागी होऊ नये हा सर्वस्वी निर्णय जनतेने स्वतः घ्यावा. यात प्रशासनाचा कोणताही सहभाग नसणार. पण या कालावधीत शासन निर्णयांचे उल्लंघन करणार्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.”
-आबा महाजन, तहसीलदार, शिरपूर
“लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी जनतेच्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी त्यांनी निर्णय घेतला आहे. हा कर्फ्यू जनतेचा आहे. त्यामुळे प्रशासन कर्फ्यू पाळण्यासाठी कोणतीही सक्ती करणार नाही.”
-अमोल बागुल, मुख्याधिकारी, शिरपूर-वरवाडे न.प.