शिरपूर:शहरातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शहरात पुन्हा एकदा जनतेच्या विनंतीवरून शिरपूर-वरवाडे नगरपरिषद क्षेत्रात पाच दिवसीय जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिली. दरम्यान रुग्णालय व औषधी दुकाने वगळता सर्वच बंद करण्यात आले आहे.
शिरपूर शहरासह तालुक्यात कोरोनाने नुकतेच शतक पूर्ण केले आहे.तसेच रोजच कोरोना रुग्ण आढळून येत असून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी व जनतेच्या आरोग्यासाठी बुधवारी, 17 जून ते रविवारी, 21 जून असे पाच दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. या अगोदर देशात 20 मार्च ते 22 मार्च असे दोन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर तीनच दिवसांनी 25 मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतरही स्थानिक पातळीवर वाढत्या कोरोना रुग्ण संख्येनुसार काही प्रमाणात कर्फ्यूसारखे प्रयोग राबविण्यात आले आहेत.
शिरपूर शहरात देशातील जनता कर्फ्यूनंतर दुसर्यांदा जनतेच्या मागणीनुसार प्रशासनाकडून पाच दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येत आहे. या अगोदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना शहरात 29 मे ते 2 जून असे पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. तरीही शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होतच आहे. आतापर्यंत तालुक्यात 112 कोरोना रुग्ण झाले आहेत. त्यात शहरातील 102 रुग्णांचा समावेश असून तालुक्यात कोरोनाने 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व जनतेच्या आरोग्यासाठी जनतेच्या मागणीनुसार शहरात दुसर्यांदा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. याकाळात शहरातील दवाखाने व त्यांच्याशी संलग्न मेडीकल स्टोअर्स वगळता सर्वच बंद राहणार आहे.
जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
मान्सूनचा कालावधी पाहता कृषी विषयक दुकाने सकाळी 8 ते 12 या काळात सुरू राहतील. तसेच दूध डेअरी सकाळी 7 ते 8 व सायंकाळी 6 ते 7 या काळात सुरु राहतील. उर्वरित इतर सर्व दुकाने/आस्थापने बंद राहणार आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. मास्कचा वापर करावा. हात दिवसभरात सात ते आठ वेळा साबणाने स्वच्छ धुवावे. एकमेकांमध्ये कमीत कमी पाच फूटाचे अंतर ठेवावे. आरोग्य पथकास खरी माहिती देऊन सहकार्य करावे. कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सर्व नगरसेवक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकार्यांनी केले आहे.