शिरपूरात राष्ट्रीय तांत्रिक परिषद

0

शिरपूर। येथील आर.सी.पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कन्व्हर्जेस 2016-17या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कन्व्हर्जेस- 2016-17या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिषदेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारीहोते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ.के.बी.पाटील यांच्याहस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टी.सी.एस. या बहुराष्ट्रीय नामांकित उद्योगसमूहातील वरिष्ठ अधिकारी प्रवीण भामरे, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. येथील भव्य प्रांगणात हवेत फुगे सोडून तसेच महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करुन या परिषदेला सुरूवात करण्यात आले. यावेळी सेमिनार हॉलमध्ये कन्व्हर्जेस बाबत विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रफीत दाखविण्यात आली व कन्व्हर्जेस ई-प्रोसिडींग सीडीचे अनावरण करण्यात आले.

माजी कुलगुरुंचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांनी नुसतेच पुस्तकी ज्ञान न घेता सर्वांना उपयोगी पडेल अशा बाबी आत्मसात कराव्या. भावी जीवनात अनेकांच्या उपयोगी पडून आपल्या हातून समाजसेवा घडू द्यावी. अनेक तंत्रे आत्मसात करुन यश संपादन करावे असे आवाहन डॉ.पाटील यांनी केले. राज्य शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी आर.सी.पटेल इंजिनिअरींग कॉलेजच्या आठवणी सांगून कॉलेजचे कौतूक केले.

राज्यभरातून महाविद्यालयांचा सहभाग
या परिषदेत शोधनिबंध सादरीकरण, रोबो रेस, रोबो वार, सी-क्विझ, सी-कोलीजीअम, वेब डिझाईन, सर्किट म्यानिया, इलेक्ट्रो क्रेझ, कॅम्पस कम्युनी,ब्रिज मेकिंग, वादविवाद, गृप डिस्कशन, भित्तीपत्रक सादरीकरण तसेच क्विझ कॉम्पेटीशन असे कार्यक्रम घेण्यात आले. राज्यभरातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील 993 तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयातील 653 विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी नाव नोंदणी केली होती.

नवनवीन प्रवाहांसाठी केले आवाहन
यावेळी प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील यांनी संस्थेसह कॉलेजच्या यशाबद्दल व प्रगतीविषयी तसेच महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणार्‍या उपक्रमांविषयी सविस्तर विवेचन केले.प्रमुख पाहुण्यांचा परीचय व सूत्रसंचलन वैष्णवी मुंदडा हिने केले. आभार प्रा.एन.एन.पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकसित होणार्‍या नवनवीन प्रवाहांची ओळख व्हावी, त्यामुळे निर्माण होणार्‍या आव्हानांचा समर्थपणे सामना करण्याची क्षमता यावी तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पना व संशोधने मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आर.सी.पटेल इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे दरवर्षी कन्व्हर्जेस आयोजन केले जाते.