शिरपूर आता स्वच्छतेत नापास!

0

शिरपूर । शिरपूर  स्वच्छ, सुंदर व हागणदारी मुक्त शहर म्हणून राज्यात सर्व प्रथम क्रमांक मिळवणारी शिरपूर वरवाडे नागरपरिषेदेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आले आहे. दरम्यान शहरातील परिस्थिती पाहता सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. एकदा नव्हे तर सलग तीन वेळा राज्यात प्रथम क्रमांकाने येणारी नगरपालिकेस या यावर्षी शासनाकडून 25 लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्वच्छतेचे गोडवे गाणारी नगरपालिका स्वच्छतेचे प्रत्येक्ष काम करते की फक्त कागदोपत्री स्वच्छता दाखवते असा सवाल नागरिकांच्या मनात सलत आहे. शहरातील करवंद नाक्यावरील सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर असलेल्या कचरा कुंडी(पेटी) गेल्या अनेक दिवसापासून उचलली गेली नसल्याने त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याठिकाणी दुर्गधी पसरलल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. तेथे शौचास जातांना नागरीकांना फार मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. एरव्ही लहान लहान गोष्टीकडे लक्षदेणारी येथील नगरपालिका नेमकी याकडे का दुर्लक्ष करीत आहे हा देखील प्रश्न या निमित्ताने पूढे येत आहे.

बेवारस जनावरांचा हैदोस

शहरातील मुख्य बाजारपेठेतुन जाणार्‍या रस्त्यावर बेवारस जनावरे अतिक्रमण करत असतात. त्यामुळे वाहन चालकांना तसेच पायी चालणार्‍यांनादेखील मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील वर्दळीचा भाग म्हणजे पाचकंदील चौक, करवंद नाका, कोर्ट चौक, बस स्थानक या परिसरात दिवसभर बेवारस मोकाट जनावरे हिंडत असतात.  ही जनावरे रस्त्यांच्या मधोमध बसून असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. परंतु पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

बाजारपेठेत अतिक्रमण आणि खड्डे

बसस्थानक ते एसपीडीएम कॉलेज या मुख्य बाजारपेठ असलेला रस्त्यावर हॉकर्स व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण वाढवल्यामुळे वाहनधारकांची गोची होते. तर बेवारस जनावरे रस्त्यावर बसल्यांमुळे अतिक्रमणात अधिक भर झाल्याचे दिसते. तर या मुख्यरस्त्यांवर खड्डे पडले आहेत. परंतु खड्डे बुजवण्याची कार्यवाही होतांना दिसत नाही. वाढत्या अतिक्रमणामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असून वाहतुकीस नियमित अडथळा होत असतो. तरीदेखील पालिका प्रशासन तसेच वाहतूक पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा सूर निघत आहे.

अस्वच्छतेमुळे आरोग्यास धोका

 पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचते. तर काही उघड्या गटारींचे पाणी रोडवरून वाहू लागते. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नसून नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी त्या खड्ड्यात साचते. व त्याच पाण्यात बेवारस जनावरे बसतात, डुकरं,कुत्रे आपली विष्टा टाकतात. त्यामुळे सर्वत्र दुर्घन्धी निर्माण होत असून याकडे पालिका प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज नगरिकांमधून व्यक्त केली जात आहे.