265 हजारांची लाच भोवली : धुळे एसीबीची शिरपुरात कारवाई
धुळे : सातव्या वेतन आयोगाचा फरक मंजूर करून देण्यासाठी एकूण रकमेच्या 10 टक्के रक्कम अर्थात 65 हजार रुपये लाच स्वरूपात स्वीकारताना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे सहाय्यक अधीक्षक व कनिष्ठ लिपिक यांना अधीक्षकांच्या कक्षातच धुळे एसीबीच्या पथकाने पकडल्याने आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली. 22 ऑगस्ट रोजी लाचेची मागणी झाल्यानंतर बुधवार, 4 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सापळा यशस्वी झाला. सहाय्यक अधीक्षक गोपाळ पितांबर राणे (51, प्लॉट न.43/1/2, स्व.प्रल्हाद तात्या नगर, करवंद रोड, शिरपूर) व कनिष्ठ लिपिक गणेश शाम माळवे (38, रा.प्लॉट नंबर 35, गजानन कॉलनी, करवंद नाका, शिरपूर जि.धुळे) अशी अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे, नाईक संदीप सरग, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, सुधीर मोरे आदींच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.
सातवा वेतन आयोग मंजुरीसाठी मागितली लाच
वैद्यकीय विभागात सेवारत असलेल्या तक्रारदाराचे सातव्या वेतन आयाचे बिल मंजूर करण्यासाठी एकूण रकमेच्या 10 टक्के रक्कम देण्याची मागणी दोघा संशयीत आरोपींनी 22 ऑगस्ट रोजी केली होती. या संदर्भात धुळे एसीबीकडे तक्रारदाराने तक्रारही नोंदवली होती. 4 सप्टेंबार रोजी रक्कम देण्याचे निश्चित ठरल्यानंतर बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अधीक्षकांच्या कक्षातच आरोपींना लाच घेताना पकडण्यात आले.
सकाळपासून पथक बसले ताटकळत
दोघा आरोपींनी सुरुवातीला बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास लाच स्वीकारू, असे सांगितल्याने एसीबीचे पथक सापळा लावून तयार होते मात्र आरोपींनी अचानक आपला प्लॅन बदलत दिवसभराचे संपूर्ण काम आटोपले व दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जेवणाच्या सुटीत तक्रारदाराकडून लाच मागितली. यावेळी पंचांनी इशारा करताच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सकाळी 11 ते 2.30 वाजेपर्यंत सापळा यशस्वीतेसाठी एसीबीचे पथकही ताटकळत थांबून होते.