शिरपूर: तालुक्यातील आमोदे येथील दोनही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनावर मात करत गुरुवारी, 7 मे रोजी सायंकाळी आमोदे येथे परतले आहेत. त्यामुळे शिरपूर तालुका कोरोना मुक्त झाला आहे. या रुग्णांना श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी उशिरा गावात पोहचल्यावर दोन्ही महिलांचे टाळ्या वाजवून, पुष्पवृष्टीसह औक्षण करून स्वागत करण्यात आले.
यावेळी आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकार्यांसह कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
दोन दिवस कोरोनाची चाचणी
धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 34 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शिरपूर तालुक्यातील दोन महिलांचा समावेश होता. त्या दोन्ही महिला रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात या रुग्णांना 14 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांची दोन दिवस कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आले. त्यामुळे या दोन्ही महिलांना 7 मे रोजी सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन
आमोदे येथील दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. परंतु आता दोन्ही महिला कोरोनामुक्त झाल्याने महिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्या दोन्ही महिला रात्री उशिरापर्यंत आमोदे गावात परतल्या आहेत. शिरपूर तालुका कोरोना मुक्त झाला असला तरी नागरिकांनी कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी, शारीरिक अंतर ठेवावे, नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, न.पा.चे मुख्याधिकारी अमोल बागुल व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी केले आहे.