शिरपूर तालुका ठरतोय हॉटस्पॉट: १४ रूग्णांना कोरोनाची लागण

0

शिरपूर: येथील १४ रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. शिरपूर शहरात १४ पैकी अंबिका नगर येथे दहा तर पारधी पुरा येथील तीन रुग्ण आढळले तर

शहराजवळील कळमसरे एक असे चौदा रुग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील वाढत्या संख्येमुळे शिरपूर हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या संख्येने तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरपूर शहरासहित तालुक्यात आतापर्यंत २३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यात ६ रुग्ण उपचारांती निगेटिव्ह आले असून तीन रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. काल दोन व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने
तालुक्याची चिंता वाढली आहे. तीन पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी परतले होते. त्यामुळे शहरासहित तालुक्यातील जनता आनंद व्यक्त करीत असताना शिरपूर शहरात थेट १४ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आनंदावर विरजण पडले आहे. तालुक्यात २३ पॉझिटिव्ह रुग्ण असताना एकाच दिवशी १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने थेट रुग्णांची संख्या ३७ वर पोहचली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका हा सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहत असल्याने शहरवासियांबरोबर तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरासहित तालुक्यात प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात येत आहे. संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. शहरात व तालुक्यात संशयितांची तपासणी करण्यात येत आहे तर काहीना होमक्वारटाईन केले जात आहे.