शिरपूर तालुका पोलिसांनी पकडला चार लाखांचा गांजा
207 किलो ओला गांजा जप्त : एकाविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा
शिरपूर : धुळे स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई सुमारे चार लाख रुपये किंमतीचा 207 किलो ओला गांजा रविवार, 3 रोजी सायंकाळी जप्त करण्यात आला. शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा या अतिदुर्गम गावातील वनजमिनीवर गांजाची अवैध शेती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त कारवाई करण्यात आली. उदय बुधा पावरा (महादेव दोंदवाडा) या इसमाच्या जमिनीवर गांज्याची शेती केली जात असल्याने त्यांच्याविरोधात कॉन्स्टेबल प्रकाश भील यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात गांज्याची शेती करण्याचे प्रकार वाढल्याने याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा येथील अतिदुर्गम भागात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी गांजाची सर्व रोप जप्त केली. या कारवाईत चार लाख 14 हजार 400 रुपये किंमतीचा 207 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ, भिकाजी पाटील, नरेंद्र खैरनार, लक्ष्मण गवळी, राजेंद्र मांडगे, संजय माळी, संजय देवरे, जाकीर शेख, चत्तरसिंग खसावद, रणजीत वळवी, योगेश मोरे, प्रकाश भील, संतोष पाटील, इसरार फारूकी व धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी केली.