शिरपूर । येथील अॅड. प्रीती अशोक श्रीराम हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) पदावर निवड करण्यात आली आहे. प्रीतीने 107 गुण मिळवल्याने ती मुलाखतींसाठी पात्र ठरली होती. ती मुलाखतीत 29 गुण मिळवून यशस्वी ठरली. या मुलाखतीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या प्रक्रीयेत 409 जण प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 131 जणांची निवड करण्यात आली आहे. अॅड.प्रीती श्रीराम हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील एच आर पटेल कन्या विद्यालयात झाले असून तिने पुणे येथील आय एल एस विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवी व एलएलएम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. ती येथील पत्रकार अशोक श्रीराम यांची मुलगी आहे. तिला अॅड.एस.आर.सोनवणे, अॅड.पी.पी.एंडाइत, अॅड.निखिल सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.