शिरपूर:प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2019 अंतर्गत भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई यांच्यावतीने माजी मंत्री अमरीशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील कापूस पीक लाभधारक शेतकरी बांधवांसाठी २९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ अंतर्गत शिरपूर तालुक्यातील ६ हजार ८०१ कापूस लाभार्थी शेतकरी बांधवांना २९ कोटी रुपयांचा पिक विमा मंजूर झाला आहे. येत्या काही दिवसात लवकरच त्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होईल, असे जिल्हा कृषी खात्याकडून कळविण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी कापूस पीक विमा ७५ कोटी रुपये एवढा मंजूर झाला आहे. त्यापैकी सुमारे २९ कोटी रुपयांचा पिक विमा शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर झाला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शेतकरी बांधवांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. शेतकरी बांधवांचे अवकाळी पावसामुळे, गारपिटीने झालेले नुकसान भरपाई तसेच पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्याबाबत प्रशासनाने दखल घेऊन पिक विमा मंजूर केलेला आहे. यापूर्वी मोर्चाच्या काही दिवसानंतर १२५४० शेतकरी बांधवांना पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे.
कापूस पिकासाठी खरीप पीक विमा मंजूर होण्यासाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आ. काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याबद्दल त्यांचे सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांनी मनापासून आभार मानले आहेत.