शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला भागात तीन घरांना आग : वृद्ध महिलेचा होरपळल्याने मृत्यू

शिरपूर : तालुक्यातील नागेश्वर बंगला येथे शनिवारी दुपारच्या सुमारास तीन घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 60 वर्षीय वृद्ध महिलेसह चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. नवशीबाई बाबूलाल चव्हाण (60) असे मयत वृद्धेचे नाव आहे.

चार्‍याला आग लागताच घरेही पेटली
शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला येथे कैलास बाबू चव्हाण हे अपंग आई नवशीबाई चव्हाण राहत होते. घराच्या बाजूला गुरांचा गोठा असून त्यात चारा देखील साठवून ठेवण्यात आला होता. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चार्‍याला अचानक आग लागली. वार्‍यामुळे आगीने क्षणार्धात भडका घेत तीन घरांना गवसणी घातली. आगीचे लोळ घरात घुसत असल्याने सदर अपंग महिलेला घराबाहेर निघताच आले नाही. या आगीत नवशीबाई बाबू चव्हाण यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्याचबरोबर गोठ्यात बांधलेले 4 जनावरे, दोन मोटारसायकली घरातील संसारोपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.

अग्निशमन दलाची धाव
आगीची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला माहिती देऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केला दरम्यान अग्निशामक दलाचे
बंब तत्काळ घटनास्थळी पोहचत आग विझविली. अग्निशामक दलाच्या मदतीने सदर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले मात्र घरात अडकून पडल्याने महिलेला व जनावरांना वाचविण्यात अपयश आल. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी गोरख लालाचंद बंजारा यांनी खबर दिल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात अग्निउपद्रवाची व अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.