शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे

0

शिरपूर । शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी येत्या 7 ऑक्टोबरला निवडणुक होत आहेत. थेट जनतेतून सरपंचपदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. ही निवडणुक म्हणजे भविष्यात होणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. ग्रा.पं.या पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी राजकीय वरदहस्त असलेला कार्यकर्ता या निवडणूकीत भाग घेत असतो. त्यामुळे तालुक्यात अनेक गावांमध्ये काँग्रेस विरुध्द काँग्रेस अशी लढत असते. परंतु यावेळी राज्यात व केंद्रात भाजपाने सत्ता मिळवली असल्याने तालुक्यात देखील भाजपाने देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तालुक्यातील 17 ग्रामपंचायत पैकी 12 ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे.

तालुक्यातील सरपंच आरक्षण याप्रमाणे
थाळनेर (सर्वसाधारण), करवंद (सर्वसाधारण महिला), अजनाड(सर्वसाधारण महिला), मांजरोद(सर्वसाधारण), हिसाळे (सर्वसाधारण महिला),महादेव दोंदवाडे(अनुसूचित जमाती महिला), वरझडी(अनुसूचित जमाती महिला), तर्‍हाडकसबे (अनुसूचित जमाती महिला), बोराडी(अनुसूचित जमाती महिला), हाडाखेड (अनुसूचित जमाती महिला), खंबाळे(अनुसूचित जमाती), तोंदे(अनुसूचित जमाती महिला), खर्दे पाथर्डे(नागरीकांचा मागास प्रवर्ग), अजंदे बु॥(नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला), अर्थे बु॥(नागरीकांचा मागास प्रवर्ग), अर्थे खु॥(नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला), वाघाडी (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला) याप्रमाणे सरपंचपदासाठी आरक्षण आहे.

बोराडीत भाजपा व काँग्रेसची लढत
तालुक्यातील बोराडी, अर्थे खु॥, अर्थे बु॥, थाळनेर, करवंद येथील ग्रामपंचायत निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. बोराडी ग्रामपंचातीवर भाजपाचे तालुकाध्यक्ष राहूल रंधे यांचे वर्चस्व आहे. रंधे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तालुक्यात सर्व कार्यकत्यांना सोबत घेवून भाजपाची पाळेमुळे कशी खोलवर जातील यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या निवडणुकीसाठी ते देखील जोमाने कामाला लागले असून त्यांच्या गटाकडून सरपंचपदासह पुर्ण उमेदवार उभे केले जाणार असल्याचे वृत्त आहे. बोराडी येथे राष्ट्रवादीत काम करणारे राजेंद्र साहेबराव पाटील यांना काँग्रेसने मोठा गाजावाजा करत काँग्रेसमध्ये प्रवेश दिला असल्याने काँग्रेस श्रेष्ठींकडून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आदेश दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गावपातळीवरील निवडणुकीतील बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष
तालुक्यात सध्या उष्णतेचे वातावरण असून त्यातच निवडणुकीचे वातावरण हळूहळू गरम होवू लागले आहे. तालुक्याचे नेतृत्व हे गावपातळीवरील निवडणुकीतील बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष ठेवून असते. या निवडणुकीसाठी 15 ते 22 सप्टेंबर दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4.30 पयरत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. 25 रोजी अर्जाची छाननी होवून 27 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार आहे. त्याच दिवशी चिन्ह वाटप होवून 7 ऑक्टोबर रोजी 7.30 ते सायं.5.30 वा. दरम्यान मतदान होवून 9 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. सरपंच पदाची निवडणुक थेट जनतेतून पहिल्यांदाच होत असल्यामुळे नागरीकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. तालुक्यात निवडणूकीमुळे गरम होत असलेले वातावरण थंड होण्यासाठी 9 ऑक्टोंबरची वाट पाहवी लागणार आहे.

उमदेवारांची चाचपणी सुरू
थाळनेर ग्रामपंचायतीवर सध्या एकनाथ जमादार यांचे वर्चस्व आहे. ते पुन्हा नसीब आजमाविणार असल्याने त्यांनी चाचपणी सुरु केली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रसचे माजी सरपंच ज्ञानेश्‍वर पितांबर पाटील हे तयारीला लागले असल्याचे वृत्त आहे. तेथीलच दिपक जमादार हे सध्या भाजपवासी झाले असल्याने ते देखील या निवडणुकीत उडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यात एकेकाळी गुढीपाडव्यादिवशी वादग्रस्त ठरलेले करवंद या गावात जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांचे वर्चस्व आहे. या गावात त्यांच्या विरोधात एकेकाळी हातात हात घालून नांदणारे व नंतर टोकाचा विरोध पत्करलेले लक्ष्मण पाटील व काशिनाथ राऊळ यांनी पुन्हा हातात हात घेतला असल्याचे वृत्त आहे. ते देवेंद्र पाटील यांच्या विरोधात आव्हान आहे. अर्थे बुद्रुक येथील माजी सरपंच साहेबराव दगा पाटील हे गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायतीत वर्चस्व मिळविण्यासाठी कामाला लागले आहेत. येथे पं.स.सदस्य चेतन पाटील यांचे वर्चस्व आहे. अर्थे खुर्द येथे माजी उपसभापती दिपक गुजर व महिला बालकल्याण सभापती वंदना गुजर यांच्या विरोधात अनिल गुजर हे रणशिंग फुंकतील, असे सांगितले जात आहे.