शिरपूर तालुक्यात वादळी वार्‍यामुळे केळी पिकांचे नुकसान

0

शिरपूर। शिरपूर शहर व तालुक्यात शनिवार सायंकाळी आलेल्या वादळी वाक्षर्‍यासह पावसाने शहरात व ग्रामीण भागात काही ठिकाणी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी केळी व इतर अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी नुकसानग्रस्त भागातील पिकांचे संबंधीत अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. शनिवारी आलेल्या वादळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील वाडी येथील शेतकरी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे संचालक नामदेव श्रावण चौधरी यांच्या शेतातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. तेथे प्रत्यक्ष जावून आमदार काशिराम पावरा यांनी पाहणी केली. तसेच संबंधीत अधिकारी यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्या समवेत शिरपूर साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाश मगन चौधरी, शेतकरी उपस्थित होते. गावातील शेतकरी राजपूत यांच्याही केळी बागेचे नुकसान झाल्याचे समजते.

काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित
दहिवद येथेही पाच शेतकरी बांधवांच्या केळी पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथेही आ.काशिराम पावरा यांनी भेट देवून पाहणी केली. दहिवद शिवारात अभिमन फकिरा पाटील रा.अजंदे, उत्तम फकिरा पाटील, हिंमतराव ढोमण दोरीक, उमेश रमणलाल गुजराथी, कुणाल रमणलाल गुजराथी, मोहन रमणलाल गुजराथी यांच्या शेतातील केळी पिके आडवे पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी दहिवद येथील माजी सरपंच श्रीमती दोरीक, अजंदे येथील ग्रा.पं.सदस्य जितेंद्र पाटील, गणेश पाटील, स्वीय सहाय्यक बी.डी.शिरसाठ, किशोर माळी, शेतकरी उपस्थित होते. शिरपूर शहरात वादळी वा-यामुळे शहरातील अनेक भागात झाडे वझाडांच्या मोठया फांद्या पडल्याने अनेक ठिकाणी विज गायब झाली होती. विज वितरण कंपनीचे काही कर्मचारी तसेच उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्याआदेशान्वये नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पडलेल्या झाडांच्या मोठमोठया फांद्या लवकर उचलण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवले होते.