शिरपूर तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारासह तिघांविरुध्द गुन्हा दाखल

0

शिरपूर:जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून तालुक्यातील मालकातर गावात १० जून रोजी अचानक धाड टाकली असता गहु व तांदुळाचा जास्तीचा साठा आढळुन आल्याने संबंधित स्वस्त धान्य दुकानदार व साठवणूक करणाऱ्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालकातर हे गाव मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने धान्यांच्या वाटपाबाबत अनियमितता होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा कार्यालयास प्राप्त झालेल्या होत्या. त्यामुळे त्या भागातील धान्य वाटपावर जिल्हा प्रशासनाचे बारकाईने लक्ष होते. १० जून रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून गावातील रेशन दुकानांवर पथकाने अचानक धाड टाकली. तेथे उपस्थित पदम पाडका पावरा यांनी त्यांच्या घरातील धान्यसाठा दाखवला. तथापि शासकीय गोदामातुन देण्यात आलेला धान्यसाठा व प्रत्यक्ष साठा याचा ताळमेळ मिळुन आला नाही. पदम पावरा यांनी रविंद्र विक्रम पावरा यांच्या घरामध्ये उर्वरित धान्य असल्याचे सांगितल्याने पथकाने त्याची मोजदाद केली. शासकीय गोदामातुन ७२.५० क्विंटल गहु दिलेला असतांना प्रत्यक्षात १३.५० क्विंटल गहु जास्तीचा आढळुन आला. तसेच शासकीय गोदामातुन कोणत्याही योजनेचे तांदुळ देण्यात आलेला नसतांना १९.९० क्विंटल तांदुळ संबंधित ठिकाणी आढळुन आला.

जास्तीचे धान्य हे काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवुन ठेवले असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही इसमाकडे धान्य साठवणुक करण्याबाबत कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी अथवा नोकरनामा नाही. संबंधित स्वस्त धान्य दुकानदार नवलसिंग पाडवी पावरा यांना वारंवार दुरध्वनी करुन सुध्दा उपस्थित राहिले नाही. तसेच साठा नोंदवही व विक्री नोंदवही उपलब्ध करुन दिले नाही. दुकानदार हे लाभार्थ्यांना ३५ किलोऐवजी १० किलो धान्य दिल्याचे लाभार्थ्यांनी जबाब नोंदविले आहे.

याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी धुळे यांचे आदेशान्वये पुरवठा निरीक्षक मायानंद भामरे यांनी तालुका सांगवी पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिल्यावरून दुकानदार नवलसिंग पाडवी पावरा, पदम पाडका पावरा, रविंद्र विक्रम पावरा यांच्या विरुध्द जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“धुळे जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे शासकीय धान्यांची बेकायदेशीर साठवणुक अथवा वाहतूक करुन कोणी काळाबाजार करीत असेल तर याबाबत जिल्हा प्रशासनास माहिती द्यावी. अशा व्यक्तीचे नावे गोपनिय ठेवण्यात येतील.अशा काळाबाजार करणाऱ्याविरुध्द प्रसंगी मोक्का सारख्या कठोर कायद्याचा सुध्दा वापर करण्यात येईल.”
रमेश मिसाळ
जिल्हा पुरवठा अधिकारी