शिरपूर। महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरपूर वरवाडे नगर परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रात तिस-यांदा सर्वोत्तम तसेच नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी 3 कोटी रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र बक्षिस देवून 4 मे रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक, अधिकारी यांना मुंबई येथे गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दि. 20 एप्रिल हा प्रथम नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला. यनिमित्त महाराष्ट्रातील सर्व सहा विभागांमधून उत्कृष्ट नगरपरिषदा जाहीर करण्यात आल्या.
यांनी स्वीकारला पुरस्कार
याप्रसंगी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, बांधकाम सभापती संगिता देवरे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, नगरसवक देवेंद्र राजपूत, रज्जाक कुरेशी, इरुान मिर्झा, राजू शेख एजंट, सलिम खाटीक, संतोष माळी, दशरथ भिल, सुभाष गवळी, पौर्णिमा पाठक, शिक्षण मंडळ सदस्य् किशोर माळी, न.पा.चे दिलीप माळी, सदानंद, विनय मिश्रा, जितू राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
कौतुकाचा वर्षाव
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, नगर विकास प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, आमदार राजपुरोहित, बिरेंद्रसिंग विराजमान होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. डॉ.रणजित पाटील यांनी आपल्या मनोगतातून सर्व नगरपरिषदांच्या उत्कृष्ट कामाबद्दल कौतुक केले. शिरपूर वरवाडे नगर परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नगर परिषद हा पुरस्कार देवून गौरवितांना उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
जनहिताच्या कामाचा सन्मान
माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली जात असल्याने दरवर्षी वेगवेगळया स्वरुपातील बक्षिसांचा वर्षाव सुरुच आहे. नगरपरिषदेमार्फत जनहिताची केली जाणारी नियमित कामे, स्वच्छता आणि मुलभूत सुविधांच्या पूर्ततेमुळे हा सन्मान झाला आहे. सुरुवातीस संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत शिरपूर नगर परिषदेने दोनदा प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातत्याने अतिशय चांगले काम नगर परिषदेमार्फत सुरु आहे.