शिरपूर पॅटर्नवरून आढावाबैठकीत रंगला ‘कलगीतुरा’

0

धुळे : जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेस व भाजपाच्या पदाधिकार्‍यांमध्ये शिरपूर पॅटर्नवरील चांगलाच कलगीतुरा रंगल्याने जिल्ह्यात या बाबीची चांगलीच चर्चा रंगली. भाजपाचे तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. जितेंद्र ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी मंत्री प्रा. शिंदे यांना सांगितले की, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शिरपूर तालुक्यात जी कामे केली जात आहेत त्याला शिरपूर पॅटर्नची नावे दिली जात आहेत.

हे चुकीचे असून जलयुक्तच्या कामांना शिरपूर पॅटर्नची नावे देणे योग्य नाही, असे सांगताच जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी मंचावर उभे राहत कॉँग्रेसचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्त्वात ही कामे केली जात आहेत. त्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता वाढणार आहे तसेच अनेक कामेदेखील केली जात असल्याचे ते म्हणाले. शिरपूर पॅटर्नवरून पदाधिकार्‍यांमध्ये कलगीतूरा रंगताच मंचावर उपस्थित भाजपाचे पदाधिकारी व जि.प.अध्यक्ष यांच्यात अधिक वाद वाढू नये म्हणून खबरदारी घेत प्रा.शिंदे यांनी मध्यस्थी करीत वादावर पडदा टाकला.