शिरपूर येथून अनिल वडनेरे यांची धुळ्यात वापसी

0

धुळे। जिल्हांतर्गत पोलिसांच्या बदल्यांनंतर आता पोलीस निरीक्षक दर्जाच्या सहा अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या आहेत. त्यात चार प्रशासकीय कारणास्तव तर दोन विनंतीवरुन बदल्या आहेत. अंतर्गत फेरबदल देखील करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाणारी ब्रँच म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात (एलसीबीला ) कायमस्वरुपी अधिकारी देण्यात आलेला नाही. परंतूृ, ’एलसीबी’साठी निरीक्षक रमेशसिंह परदेशी, दिवाणसिंग वसावे आणि संभाजी पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या तिघा अधिकार्‍यांनी या पदावर विराजमान होण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.

शिरपुरचे संजय सानप नवे पीआय
पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी गेल्याच आठवड्यात जिल्ह्यातील सुमारे 300 पोलिसांच्या जिल्हांतर्गत बदल्या केल्यात. यानंतर आता बुधवारी रात्री उशीरा सहा निरीक्षकांच्याही जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात नाशिक येथून आलेले संजय सानप यांची शिरपूर शहर प्रभारी अधिकारी पदावर, तर नियंत्रण कक्षातील बाळासाहेब लोटन पाटील यांची शिरपूर शहर पोलीस ठाण्यातच दुय्यम अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. दोंडाईचा पोलीस ठाण्यातून प्रकाश विश्‍वनाथ मुंडे यांची शहर वाहतूक शाखेत, नंदुरबार येथून आलेले रामदास सुकदेव पाटील यांची साक्री पोलीस ठाण्यात तर साक्री पोलीस ठाण्याचे वसंत सोनोने यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. शिरपूर येथून अनिल वडनेरे यांची पुन्हा धुळे शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. मात्र, शहर पोलीस ठाण्याचे दिवाणसिंग वसावे यांची बदली कुठे झाली हे अद्याप कळलेले नाही. त्यांना तात्पुरते रिझर्व्ह ठेवण्यात आल्याचे समजते. ’एलसीबी’मध्ये वसावेंची वर्णी न लागल्यास त्यांना आझाद नगर किंवा सध्या रिक्त झालेले दोंडाईचा पोलीस स्टेशनमध्ये नेमणूक देण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे