शिरपूर । शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्समध्ये दोन दुकानांना शॉर्टसर्कीटमुळे आग लागून दुकानातील 13 लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुढी पाडव्याच्या दिवशी दुपारच्या सुमारास घडली. 4 अग्नीशामक बंबांनी तब्बल अर्धा ते पाऊण तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. गुजराथी कॉम्प्लेक्समधील मांडळ रोडाकडील दोन दुकानांना आग लागली. ही आग शॉर्टसर्कीट झाल्याने लागली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गुढीपाडवा असल्यामुळे कॉम्प्लेक्समधील जवळपास सर्वच दुकाने बंद होती. कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील बन्सीलाल उखा ब्राम्हणे यांच्या मालकीच्या स्वामी समर्थ टीव्ही व दुरूस्ती दुकान तर शशीकांत भास्कर चौधरी यांचे ओमसाई इलेक्ट्रॉनिक दुकानाला अचानक आग लागल्यामुळे ये-जा करणार्या लोकांना दुकानातून आगीचा डोंब उसळत असल्याचे दिसले.
काही वेळातच अग्नीशमन बंबासह पोलिसांची घटनास्थळी धाव
कॉम्प्लेक्स समोरील रहिवाशी व दुकानदारांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी नगरपालिकेच्या अग्नीशामन दल व पोलिसांना आगीचे माहिती दिली. काही वेळातच अग्नीशामक दल व पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुकानातील संपूर्णतः इलेक्ट्रीक सामान जळून खाक झाला होता. ब्राम्हणे यांचे सुमारे 6 लाख तर चौधरी यांचे 7-8 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत टीव्ही, मोबाईल जळून खाक झालेत. आग लागलेल्या या दुकानांच्या वर एचडीएफसी बँक आहे. या बँकेचे 2 एसी, अॅक्सिस बँकेचे एटीएमचा 1 एसी व बडोदा बँकेचे एटीएमचा 1 एसी असे 4 एसी या आगीत जळून खाक झालेत. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नगरसेवक दिपक माळी, राजेश सोनवणे, राजू शेटे आदींनी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली. तलाठी गुजर हे रात्री उशिरापर्यंत नुकसानीचा पंचनामा करीत होते.