शिरपूर-शहादा महामार्गावर दारूची सर्रास विक्री

0

बामखेडा । सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर 500 मीटरच्या आत मद्य विक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे. मात्र अंकलेश्‍वर-बर्‍हाणपुर या राज्य महामार्गावरील शहादा ते शिरपूर दरम्यान हॉटेल्स, धाब्यावर छुप्या पद्धतीने सर्रासपणे दारू विक्री होत आहे. या महामार्गावरी हॉटेल्स, धाबा मालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. या छुप्यारूस्तमांना अभय कोणाचे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे सहकार्य ?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महामार्गावरील हॉटेल्स, बिअर बार मध्ये दारू बंदी तर झालीच नाही. उलट न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून हॉटेल्स मालक राजरोसपणे जादा दरात छुप्या पद्धतीने दारू विक्री करून ग्राहकांची लुट करत आहेत. शिरपूर ते शहादा या मार्गावरील मोजकेचे हॉटेल्स व धाबे आहेत. मात्र दिवसभर सेटर लावून तर छुप्या पद्धतीने तर रात्री खुलेआम दारूची विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे. या हॉटेल्स चालकांना राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलीसांची साथ असल्यामुळेच दारू विक्रीचा व्यवसाय निर्भयपणे चालवला जात असल्याचीही चर्चा परिसरातून होत आहे. शिरपूर-शहादा महामार्गावर दररोज हजारो वाहने वाहत असतात. तसेच अवैध वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणारे अवैध वाहन चालक दारूच्या नशेत वाहने चालवत असतात. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघात देखील होतात. त्यामुळे संबधित पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने योग्य कारवाई करण्याची अपेक्षा परिसरातून होत आहे.