शिरपूर-शहादा रस्त्यावर एकाच रात्रीत दोन अपघात

दूचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

शिरपूर:शिरपूर-शहादा रस्त्यावर वाघाडी ते विखरण दरम्यान 7 मार्च रोजी रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान दोन वेगवेगळे अपघात झाले. एका अपघातात पायी चालणार्‍या अर्थे येथील 70 वर्षीय वृद्धाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर भामपूर येथील पती पत्नी किरकोळ जखमी झाले आहे. दुसर्‍या अपघातात वाघाडी येथील दूचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहे. त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे.

सविस्तर असे, भामपूर येथील गुलाबराव संभाजी पाटील (53) हे पत्नी सुनीता पाटील यांच्यासह 7 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास शिरपूरकडून भामपूर येथे दूचाकीने जात असताना म्हाळसाई पेट्रोल पंपजवळ त्यांनी अर्थे येथील सोमा चैत्राम कोळी (वय 70) यांना मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे अपघात झाला. सोमा कोळी विखरणकडे शेतात पायी जात होते. ते या धडकेत गंभीर जखमी झाले. तर गुलाबराव संभाजी पाटील, पत्नी सुनीता पाटील हे देखील जखमी झाले. तिघांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारा दरम्यान सोमा चैत्राम कोळी यांची तपासणी केल्यावर डॉ.हिरेन पवार यांनी त्यांना रात्री 10 वाजता मृत घोषित केले. त्याचवेळी झालेल्या दुसर्‍या घटनेत वाघाडीजवळ ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने वाघाडी तेथील दिनेश फिरंग्या सेनानी (वय 50) हा गंभीर जखमी झाला.

ट्रकच्या धडकेत दूचाकीस्वार गंभीर जखमी
तालुक्यातील वाघाडीजवळ रात्रीच्या सुमारास दिनेश फिरंग्या सेनानी हा दूचाकी (क्र. एमपी 46 एमआर 1975) ने अर्थेकडून वाघाडीकडे शिरपूर-शहादा रस्त्यावरून येत असतांना वाघाडीजवळ एसार पेट्रोल पंपाजवळ पाटचारीलगत मागून शिरपूरकडे येणार्‍या ट्रक (क्र.एमएच 04 एएल 2979) ने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. त्यात दूचाकीस्वार दिनेश फिरंग्या सेनानी याच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यास जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी त्यास धुळे येथे हलविले आहे. या दोन्ही अपघातप्रकरणी वार्डबॉय गणेश बँडवाल यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात मोटार वाहन अपघाताची नोंद केली आहे.