कर्जाचा डोंगर असल्याने कारखाना सुरु करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे स्पष्टीकरण
चेअरमन माधवराव पाटील यांची माहिती
शिरपूर । शेतकरी सहकारी साखर कारखाना हा तालुक्ङ्मातील शेतकर्यांचाच नव्हे तर शेती उत्पन्नावर आधारीत सर्व व्यावसायीकांचा कणा आहे. यात दुमत असण्याचे कारण नाही. कारखान्याच्या अधोगतीला अनेक कारण आहे मात्र चर्चा करण्याची ही वेळ नाही. कारखाना पुनर्जीवीत व्हावा यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी कामाला लागलो असल्याची भूमिका चेअरमन माधवराव पाटील यांनी स्पष्ट केली आहे. कारखाना सुरु करणे महत्वाचे आहे मात्र कारखान्याची सद्यस्थिती समजून घेणे देखील तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कारखाना सुरु करण्यासाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागणार असून कर्जाचा डोंगर आपणास पार करावा लागणार आहे. हे सर्व चुटकीसरशी होणार नाही. मात्र कारखाना सुरु करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. व्हाईस चेअरमन दिलीप दगडू पटेल यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे.
दिल्ली कोर्टात स्थगिती
साखर कारखान्याच्या सुरळीत वाटचालीसाठी व पी.एफ. प्रश्नाबाबत औरंगाबाद खंडपीठात दारे ठोठविण्यात आले होते. परंतु, न्यायालयाने कारखान्याच्या संचालक मंडळाच्या मागणी विरोधात निकाल दिले आहे. या निर्णयाला दिल्लीतील पी.एफ.ट्रीब्युनल कोर्टात स्थगिती मिळाली आहे. कारखान्याकडे जे.डी.सी.सी. बँकेच्या 23 जूनच्या पत्रानुसार मुद्दल 2663.27 लाख व व्याज 2563.50 लाख असे एकूण 5226.77 लाख रुपये घेणे आहे.
राजकारण बाजूला ठेवा
निवडणूकीनंतर जोमाने कामाला लागलो आहोत. राज्य व केंद्र शासनाच्या कर्जाची पूर्तता व त्यासोबत इतर देणगी मिळणे गरजेचे आहे. सोबत कुठलीही आर्थिक तरतूद नसतांनाही सर्व संचालक मंडळ स्वखर्चाने कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेतकर्यांच्या हितासाठी सर्व राजकारण बाजूला ठेवून काम केले जात आहे. आरोप-प्रत्यारोप, निवेदनातून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी संघशक्तीची व संचालक मंडळावरील विश्वास गरजेचे आहे असे आवाहन चेअरमन माधवराव पाटील यांनी केले आहे.
151 कोटीचे कर्ज : केंद्र सरकार ऊस विकास कर्ज 1299.59 लाख, शासकीय भाग भांडवल कर्ज 223.25 लाख, गॅप फायनान्स 57.11 लाख, मध्यम मुदत कर्ज अपुरा दुरावा (पुनर्रचित) 322.82 लाख, मध्यम मुदत कर्ज ओ.एम.बी. 177.70 लाख, शुगर गोडाऊन कर्ज (एन.सी.डी.सी.) 53.11 लाख, अल्प मुदत कर्ज (एक्साईज) 43.69 लाख, ऊस खरेदी कर बिनव्याजी कर्ज 113.07 लाख, वित्तीय संस्थांचे कर्ज व व्याज 1776.30 लाख, बँक ऑफ बडोदा शिरपूर शाखेच्या 629.34 लाख, शासकीय आदिवासी शेअर कर्ज 42.47 लाख, कै. भिला मोतीराम महाजन पतसंस्था शिरपूर 81.17 लाख, ऊस खरेदी कर 1222.01 लाख, ऊस खरेदी कर 132.05 लाख, सेल टॅक्स अंदाजित 2 कोटी, व्यवसाय कर 43.79 लाख, पाटबंधारे विभाग 8.88 लाख, जी.एस.थोरात पुणे सी.ए. 28.92 लाख, शेतसारा 16.43 लाख, हिंदुस्थान गनी बॅग्स अॅण्ड अलाईड सप्लायर्स श्रीरामपूर 2 कोटी 26 लाख 27 हजार असे एकूण 151 कोटी 52 लाख रुपयांचे घेणे आहे.