बारामती । बारामती, दौंड व पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या शिरसाई, जानाई व पुरंदर पाणी उपसा सिंचना योजना सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांकडे चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यासाठी 4 सप्टेंबरला पुण्यात संबंधित विभागाचे पदाधिकारी, अधिकार यांची बैठक आयोजित केली आहे. जर ही बैठक यशस्वी झाली तर आगामी काळामध्ये दुरुस्ती किंवा वीजबिलाअभावी योजना बंद पडणार नाहीत. याचा फायदा या योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतीला होणार असून त्यांना कायमस्वरुपी सिंचन सुविधा उपलब्ध होणार असल्याचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कटफळ ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकासकामे, भूमिपूजन आणि लोकार्पण आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते. आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद आध्यक्ष विश्वास देवकाते, रोहित पवार, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
उपसासिंचन योजनांना ग्रहण
शिरसाई, जानाई व पुरंदर उपसासिंचन योजना संबंधित भागातील जिरायत भागाला वरदान ठरल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षापासून या योजनांना ग्रहण लागले आहे. वीजबिल थकबाकी, दुरुस्ती निधी या कारणांमुळे या योजना बंदच राहतात. त्यामुळे जलसिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचाही सामना करावा लागतो. परिणामी आजही तालुक्यामध्ये 27 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. याचा गांभिर्याने विचार करून या प्रश्नावर कामय स्वरुपी तोडगा काढण्यासाठी सदर योजना या सहकारी तसेच खाजगी कारखान्यांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. यामध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती अँग्रो, व दौंड शुगर या कारखान्यांच्या माध्यमातून सदर योजना कायम स्वरुपी कार्यन्वित करण्यात येणार आहेत.
कटफळ ग्रामपंचायतची कार्य कौतुकास्पद
शासनाच्या निधीची वाट न पाहता विविध कंपन्यांच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून कटफळ ग्रामपंचायतीने केलेली विकासकामे आदर्शवत आणि कौतुकास्पद असल्याचे पवार यांनी सांगितले. विकासासाठी नागरिकांनीसुद्धा वेळेवर कर भरावा, विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, निर्व्यसनी रहावे, सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला. गावामध्ये एसटी चालू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
रेल्वेमुळे वाढणार महत्त्व
प्रस्तावित दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारी रेल्वे लाइन कटफळमधून जाणार असल्याने कटफळचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे जमिनी विकू नका, त्याचे जतन करा आणि पुढील पिढीसाठी तरतूद करा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच डॉ. कीर्ती मोकाशी यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील आणि ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी आभार मानले.