यावल : तालुक्यातील शिरसाड येथील एका 40 वर्षीय मेंढपाळाचा पाटचारीतील पाण्यात बुडाल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. विनोद यशवंत धनगर असे मयताचे नाव आहे. यावल पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाय घसरून मेंढपाळ पडला पाटचरीत
शिरसाड, ता.यावल येथील विनोद यशवंत धनगर हा मेंढपाळ बुधवारी सकाळी मेंढ्या चारण्यासाठी शिरसाड शिवारातील पाटचारी भागात गेला असता सायंकाळी पाटचारीजवळ मेंढी चराई करीत असताना तिला रोखण्याच्या बेतात त्याचा पाय घसरला व तो पाटचारीच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला. गावातील गोलू धनगर, कैलास धनगर, कुंदन धनगर यांनी मेंढ्यांना मेंढपाळाच्या घरी पोहोचवत कुटुंबाला याबाबत माहिती दिली. कुटुंबाकडून पाटचारी परीसरात सर्वत्र त्याचा शोध घेण्यात आला मात्र मेंढपाळ आढळला नाही. शुक्रवारी सकाळी मेंढपाळाचा मृतदेह शिरसाड शिवारातील पाटचारीत आढळला. याबाबत यावल पोलिसात जितेंद्र पांडुरंग धनगर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहे. मयत विनोद धनगर यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन मुले असा परीवार आहे.