शिरसाळे येथे खळवाडीला आग; लाखोंचे शेती साहित्य खाक

0

बोदवड। तालुक्यातील शिरसाळे येथे जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजुस असलेल्या तीन खळ्यांना आग लागून गुरांचा चारा, कडबा, कुंटी, फुटार, शेतीची लाकडी, शेती अवजारे, पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचनच्या नळ्या, टिनपत्रे जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार 21 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. घटना गावात पसरताच लग्नातील वर्‍हाड्यांनी वरात सोडून घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदत केली.

गावात दोन लग्न होती. लग्न लागायला आले होते. वरातीतील तरुण मुलांनी खळ्यातील गाई, वासरे, बैला सोडण्यास मदत केली. त्यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाही. आग लागलेल्या खळ्यांची तहसिलदार भाऊसाहेब थोरात, सभापती गणेश पाटील, गटविकास अधिकारी ए.डी. बावस्कर, जिल्हा परिष सदस्य भानुदास गुरचळ, अनिल वराडे, अनिल पाटील, श्रीकृष्ण राणे यांच्यासह मलकापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आगवर नियंत्रण मिळविले. पोलीस पाटील संदिप बोरसे . तलाठी बोराटे, ग्रामसेवक अनिल भिसे यांनी जळालेल्या जागेची, वस्तुंची पाहणी करुन पंचनामा केला.

बैलगाडी, दरवाजासह शेती सामान नष्ट
शिरसाळे येथील रामचंद्र गणपत बाजुळे यांच्या खळ्यातील दोन एकरमधील ठिबक नळ्या जमा करुन खळवाडीत गोठ्यात ठेवल्या होत्या. शेतीचे लाकडी, कोळपे, वखर, लोखंडी निफन, फडबा, पाच ट्रॉली कुट्टी, 40 पत्रे, 20 लोखंडी पाईप, पीव्हीसी पाईप, पाणी उपसण्याचा तीन अश्‍वशक्तिचा मोटार पंप, पीव्हीसी पाईप 10 नग, 65 फुटाचा हॉर्स पाईप तर गजानन शिवदस गोसावी यांचे खळ्यातील सुध्दा दोन एकरातील जमा करुन आणलेले ठिबकच्या नळ्या, पाईप, शेती अवजारे, लोखंडी लाकडी वखर, निफन, 400 टिन पत्रे, लोखंडी पाईप जळाल्यामुळे पुर्ण वाकले आहे. चारा जळून खाक झाला. सुपडू गणपत बाजुळे यांचे खळ्यातील 20 नग लोखंडी टिनपत्रे, कडवा, कुट्टी, साडेतीन एकरातील जमा केलेली ठिबक नळ्या व 40 पीव्हीसी पाईप, बैलगाडी दरवाजासह शेती उपयोगी सामान जळून खाक झाले.