शिरसोलीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

पती चौकशीकामी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील राजपाल नगरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची सोमवार, 20 जून रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या महिलेचा नेमका कोणत्या कारणाने मृत्यू झाला ही बाब समोर आलेली नाही मात्र एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर चौकशीकामी महिलेच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. नबाबाई भाऊलाल भील (32, राजपाल नगर, शिरसोली, ता.जि.जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

महिलेचा मृतदेह आढळला घरात
जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील राजपाल नगरात भाऊलाल पांडूरंग भिल (42) हा आपल्या पत्नी नबाबाई आणि सहा मुलांसह वास्तव्याला असून शेतीसह ट्रॅक्टर चालवून आपला उदरनिर्वाह करतो तर पत्नी नबाबाई ह्या जैन व्हॅलीला कामास होती. भाऊलाल भिल यांची आई शिरसोली पासून 2 किलोमीटर असलेल्या धरणाच्या ठिकाणी भिल वस्तीत राहते व त्या ठिकाणी या दाम्पत्याची मुले आजीकडे गेल्याने पती व पत्नी हे दोघेच घरी होते. भाऊलाल हा दारू प्यायला असल्याने तो घराबाहेर खाटेवर झोपला असताना सोमवार, 20 जून रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तो झोपेतून उठाला असता त्याला त्याची पत्नी किचन रूममध्ये निपचित पडलेली दिसली. त्याने शेजारी राहणार्‍या मंगलाबाई ठाकरे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अवघ्या काही मिनीटात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेने आत्महत्या केली तिचा घातपात झाला हे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पीएसआय दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ रतीलाल पवार, सचिन मुडे, जितेंद्र राठोड, शुध्दोसन ढवळे यांनी माहिती घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले व सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.