जळगाव । तालुक्यातील म्हसावद येथील मुळ रहिवासी तथा शिरसोली शिवारातील बुधली धरणाजवळ मजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या पस्तीस वर्षीय गृहस्थाचा मृतदेह आढळून आला आहे. शिरसोली रोडवरील शामाफायर वर्क्स या फटाका कारखान्याच्या मागील बाजुस टेकड्यांवर अर्धनग्नावस्थेत आढळून आलेल्या या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाचे घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात येवुन कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
अंगावर जखमा; व्हिसेरा राखीव
जळगाव शिरसोली रोडवरील शामाफायर वर्क्स या फटाका निर्मीती कारखान्याच्या पश्चिमेकडून मागील बाजुस असलेल्या टेकड्यांवरुन कुजलेल्या मृतदेहाचा उग्रदर्प सुटल्याने येणार्या जाणार्यांचे लक्ष गेले. झुडपाच्या अडोशात उपडा पडलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती शिरसोली पोलिस पाटील, श्रीकृष्ण बारी, शरद पाटील यांनी पोलिसांना कळवली. औद्योगीक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे, सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक रोहन खंडागळे, बाळू पाटील, किशोर पाटील आदींनी घटनास्थळी जावुन पहाणी केली. परिसरात शोध घेतला असता ताराचंद जंगलू भिल (वय-35) असे मयत तरुणाचे नाव निष्पन्न झाले आहे. शिरसोली शिवारातील बुधली धरण परिसरात कामगार तांड्यांवर पत्नी तीन मुलांसह ताराचंद येथे वास्तव्याला होता. तो गुरुवार 8 रोजी पासुन बेपत्ता झाल्याचे त्याच्या कुटूंबीयांनी पोलिसांना माहिती देतांना सांगीतले. औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली.