जळगाव । शिरसोली येथील 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन मंगळवारी दुपारी 2 वाजेपूर्वी आत्महत्या केली.
जगदिश प्रल्हाद पाटील (वय 32, रा. भोद, ता.धरणगाव, ह.मु. शिरसोली ) असे मयत तरुणाचे नाव आहे. जगदिश पाटील हे काही महिन्यांपासून शिरसोली कुटुंबासह राहत होते. त्यांची पत्नी आठ दिवसांपासून माहेरी गेली होती. त्यांची बहीण सुनंदा शांताराम पाटील ही त्यांना सकाळी उठवण्यासाठी गेली. मात्र, प्रतिसाद न दिल्याने भाऊ, झोपला असेल असा विचार करुन बहीण शेतात कामाला गेली. बहीण दुपारी 2 वाजता घरी आल्यानंतर तिने दरवाजा बंदच असल्याचे पाहिले. त्यामुळे तिने दरवाजा ठोठावून आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बहिणीने नातेवाइकांना बोलून दरवाजा उघडला. तर भावाने गळफास घेतल्याचे दिसले. याघटनेमुळे बहिणीने आक्रोश केला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, दोन भाऊ असा असा परिवार आहे.