जळगाव । घरात काम करीत असताना अचानक शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शिरसोली येथे घडली. समाधान लक्ष्मण पाटील (वय-25) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान पाटील हा तरूण कुटूंबियांसोबत शिरसोली येथे वास्तव्यास होता. तर हातमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास समाधान हा घरात काम करत असताना त्याला अचानक वायरीचा शॉक लागला. हा प्रकार भाऊ सतिष यास लक्षात येताच त्याने लागलीच समाधान यास मित्रांच्या तसेच ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले. परंतू, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणीअंती समाधान यास मृत घोषित केले. भावाच्या मृत्यूची बातमी कळताच सतिष याने रूग्णालयातच हंबरडा फोडला. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांसह मित्रमंडळींनी एकच गर्दी केली होती. सायंकाळी शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हाणामारी प्रकरणी सहा जणांना अटक
शहरातील मेहरूण परिसरात पिरजादे मोहल्ल्या जवळ पुलबांधण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका गटातील सहा जणांना अटक केली आहे. पिरजादे मोहल्ला येथे पुलाचे बांधकाम करण्यावरून 10 डिसेंबर रोजी रवीवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली होती. त्यात नगरसेवकासह पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी परस्पराविरूध्द गुन्हा दाखल केला होता. त्यातच आज गुरूवारी एमआयडीसी पोलिसांनी नगरसेवकाने दिलेल्या फिर्यादीतील गुन्ह्यातील संशयित शफिक मिया सईद मिया, शकील मिया सईद मिया, मुनावर मिया मजिदमिया, माजिद मिया अब्दूल मिया, हमीद मिया अब्दूल मिया, साबीर मिया सईद मिया या सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे.