शिराळ्यातील मंदिरात मृतदेह

0

सांगली । सांगलीतील शिराळा तालुक्यातील डोंगरावरील मंदिरात 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाच्या बाजूला लिंबू, काळी बाहुली सापडल्याने नरबळीचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
शिराळा तालुक्यात शिरची शिवरवाडी येथे रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे. या डोंगरावर चक्रोबा मंदिर असून या मंदिरात भाविकांची फारशी वर्दळ नसते. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु असून शनिवारी सकाळी मजूर कामासाठी मंदिरात गेला. त्याला मंदिराच्या गाभार्‍यात 50 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या बाजूला काळी बाहुली, लिंबू असे करणीसाठी लागणारे साहित्य पडले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शुक्रवारी अमावस्या होती, त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता आहे. डोक्याच्या मागील बाजूवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतदेहाच्या खिशात एक तिकीट सापडले असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.